पाकिस्तानचे समर्थन करणारा ठराव न्यूयॉर्कमधील विधानसभेत झाला संमत


न्यूयॉर्क – पाकिस्तानचे समर्थन करणारा ठराव अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यामधील विधानसभेमध्ये संमत करण्यात आला आहे. या ठरावानुसार काश्मीर अमेरिकन दिवस ५ फेब्रुवारी हा दिवस घोषित करण्यात येणार आहे. पण भारताने या ठरावाविरोधात कठोर शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे. भारताने हा ठराव म्हणजे स्वार्थी हेतूने मांडण्यात आलेला ठराव असल्याचे म्हटले आहे. तसेच भारताचा जम्मू-काश्मीर अविभाज्य भाग असून त्याला भारतापासून वेगळे करता येणार नाही. तसेच न्यूयॉर्क राज्यातील नवनिर्वाचित प्रतिनिधिंशी भारतीय समुदायाशीसंबंधित चर्चा करण्याची गरज असल्याचेही भारताने म्हटले आहे.

पाच फेब्रुवारी हा दिवस काश्मीर अमेरिकन दिवस घोषित करणारा ठराव न्यूयॉर्क स्टेट असेम्बली म्हणजेच विधानसभेमध्ये गव्हर्नर एण्ड्रू कुओमो यांनी संमत केला. ५ फेब्रुवारी हा दिवस पाकिस्तानमध्ये काश्मीर एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताने या प्रस्तावावर कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत, दोघांमध्ये दुफळी निर्माण करण्याच्या हेतूने जम्मू-काश्मीरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची चुकीची व्याख्या तयार करुन स्वार्थी हेतूने हा ठराव संमत करण्याचा प्रयत्न चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. हा ठराव विधानसभेमधील सदस्य नादर सायेघ आणि अन्य १२ सदस्यांनी मांडला होता.

काश्मीरी जनतेने अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिल्याचे या प्रस्तावामध्ये म्हटले आहे. दृढ निश्चय काश्मीरमधील लोकांनी दाखवला असून हे लोक न्यूयॉर्कमधील प्रवासी समुदायातील लोकांसाठी एक आधारस्तंभ आहेत. विविधता, जातीय तसेच धार्मिक ओळख निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्क राज्याने सर्व काश्मिरी लोकांच्या धार्मिक तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यांबरोबरच मानवाधिकारांचे समर्थन करण्याचा ठराव संमत केल्याचे या ठरावात म्हटले आहे.

या ठरावासंदर्भात मतप्रदर्शन करताना वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासामधील प्रवक्त्यांनी न्यूयॉर्कच्या विधानसभेमधील काश्मीरी अमेरिकन दिवसासंदर्भात ठरावाची माहिती मिळाल्याचे सांगितले. अमेरिकेप्रमाणेच भारत सुद्धा एक जिवंत लोकशाहीचे उदाहरण आहे. येथील १.३५ अब्ज लोक हे विविधता असणाऱ्या लोकशाहीमध्ये राहतात ही गर्वाची गोष्ट आहे. भारताचा जम्मू-काश्मीर हा अविभाज्य भाग असून कोणीही त्याला भारतापासून वेगळे करु शकत नाही. जम्मू-काश्मीरबरोबरच संपूर्ण भारत हा विविधतेने नटलेला आहे. पण जम्मू-काश्मीरच्या संस्कृती आणि सामाजिक एकतेसंदर्भातील व्याख्या आणि संमत करण्यात आलेला ठराव हा चिंतेचा विषय असल्याचे प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

या प्रस्तावासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना भारतीय दूतावासामधील प्रवक्त्यांनी भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर तसेच न्यूयॉर्कमधील सर्व भारतीय समुदायाच्यावतीने न्यूयॉर्कमधील विधानसभेच्या सर्व सदस्यांशी भारत चर्चा करणार आहे. हा प्रस्ताव तीन फेब्रुवारी रोजी संमत करण्यात आला असून कुओमो यांनी यामध्ये ५ फेब्रुवारी २०२१ हा दिवस न्यूयॉर्क राज्यामध्ये काश्मीर अमेरिकन दिवस घोषित करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

हा प्रस्ताव संमत करण्यासाठी न्यूयॉर्कमधील पाकिस्तानच्या दूतावासाने सायेघ आणि ‘द अमेरिकन पाकिस्तानी अ‍ॅडव्हकसी ग्रुप’चे कौतुक केले आहे. जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा पाच ऑगस्ट २०१९ रोजी रद्द करत जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याच्या भारताच्या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. हे प्रयत्न अनेकदा अयशस्वी ठरले असले तरी असे प्रयत्न वारंवार पाकिस्तानकडून होताना दिसत आहेत. भारताने या पूर्वीच पाकिस्तानला जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले आहे.