वजन घटविण्यासाठी आरोग्यदायी जिऱ्याचे पाणी

jeera
वजन घटविण्यासाठी आरोग्यतज्ञ, कृत्रिम औषधे टाळून, घरगुती, नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्याचा सल्ला देतात. या घरगुती वस्तूंमध्ये जिऱ्याचा ही समावेश आहे. जिऱ्याचे पाणी घेतल्याने शरीरातील चरबी घटण्यास मदत होते. जिरे हा प्रत्येक घरामध्ये अगदी दररोजच्या स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ आहे. याच्या वापराने भाजी-आमटीचा स्वाद वाढतोच, पण त्याशिवाय जिरे आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच फायद्याचे आहेत. याच्या नियमित वापराने पचनाशी निगडित समस्या दूर होतात, चयापचय शक्ती सुधारते, आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. याच्या सेवनाने वजन घटण्यास सुरुवात होऊन शरीरातील चरबीची मात्रा कमी होण्यास मदत होते.
jeera1
जिऱ्याप्रमाणेच जिऱ्याचे पाणी देखील अतिशय गुणकारी आहे. थोड्या पाण्यामध्ये जिरे काही तास भिजवून ठेवल्याने ‘ओस्मोसीस’ या नैसर्गिक प्रक्रियेमुळे जिरे पाणी शोषून घेतात आणि थोडेसे फुगतात. या प्रक्रियेमुळे जिऱ्यामध्ये असलेली गुणकारी तत्वे त्या पाण्यामध्ये येऊन हे पाणी पिवळ्या रंगाचे दिसू लागते. या पाण्याचे सेवन केल्याने वजन घटण्यास मदत होते. जिऱ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी आहे. एक मोठा चमचा भरून जिऱ्यामध्ये केवळ सात कॅलरीज असतात. जिऱ्याच्या पाण्याच्या सेवनाने पचनकार्य सुरळीत होऊन बद्धकोष्ठ दूर होण्यास मदत होते.
jeera2
जिऱ्याच्या पाण्याने शरीरामध्ये एन्झाइम्स सक्रीय होतात, ज्यांच्यामुळे साखर, कर्बोदके आणि फॅटस् व्यवस्थित पचविली जातात. शरीराचे पचनकार्य सुधारले, की शरीराची चयापचय शक्ती देखील सुधारते, जेणेकरून वजन घटण्यास मदत होते. जिऱ्याच्या पाण्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण घटण्यास मदत होते. तसेच याच्या सेवनामुळे भूक शमते आणि वारंवार काही ना काही खात राहण्याची इच्छा देखील कमी होते. जिऱ्याच्या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी, घातक पदार्थ बाहेर टाकले जाण्यास मदत होते. त्यामुळे चहा, कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्सच्या ऐवजी जिऱ्याचे पाणी पिण्याची सवय आत्मसात करणे चांगले.
jeera3
जिऱ्याचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पिण्याच्या पाण्यामध्ये एक चमचा जिरे घालावेत. जिरे भिजवून ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर अधिक चांगला. हे जिरे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेऊन सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घेऊन, रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment