मुंबई – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा यावर्षीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक, गुरू विदुषी डॉ. एन. राजम यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली असून राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, उस्ताद फय्याज हुसेन खाँ, पं. उद्धव आपेगावकर, डॉ. राम देशपांडे, श्री श्रीनिवास जोशी यांचा पुरस्कार निवड समितीत समावेश होता. समितीने सन २०२० साठीच्या पुरस्कारासाठी डॉ. एन. राजम यांची निवड केली.
विदुषी डॉ. एन. राजम यांना राज्य सरकारचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार जाहीर
व्हायोलिन वादनाच्या क्षेत्रातील अत्यंत आदरणीय अशा एन. राजम ह्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांच्या वडिलांकडे कर्नाटकी पद्धतीने व्हायोलिनचे शिक्षण सुरू केली. त्यांची तयारी बघून वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांना अनेक मोठ्या कलाकारांसोबत साथ करण्यासाठी भारतभर दौरे करण्याची संधी मिळाली. पं. ओंकरनाथ ठाकूर यांच्या गायकीने प्रभावित झाल्यामुळे त्या हिंदुस्तानी संगीताकडे आकर्षित झाल्या. पं. ओंकारनाथ ठाकूर त्या वेळी बनारस हिंदू विश्वविद्यालयात अध्यापन करीत असल्यामुळे, त्यांच्याकडे शिक्षण घेता यावे म्हणून एन. राजम यांनी तिथे प्रवेश घेतला. पंडित ठाकूर ह्यांच्याकडे शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्या वादनावर ग्वाल्हेर घराण्याचा प्रभाव पडला. गायकी अंगाने अत्यंत सुरेलपणे वादनासाठी त्या ओळखल्या जाऊ लागल्या.
तेथील शिक्षणानंतर त्यांनी तिथेच ‘फाईन आर्टस’ विभागात अध्यापनाला सुरुवात केली आणि नंतर त्या विभागप्रमुख झाल्या. सोबतच मंचीय प्रदर्शनासाठी त्यांना देश – विदेशातून निमंत्रणे येऊ लागली व त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. सुमारे चार दशके बनारस विश्वविद्यालयात अध्यापनाचे कार्य केल्यानंतर त्या गेली वीसहून अधिक वर्षे मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांची कन्या संगीता शंकर व नाती नंदिनी व रागिणी शंकर यांना व्हायोलिन वादनाचे शिक्षण देऊन आज त्या उत्तम वादक म्हणून ओळखल्या जातात. त्याशिवाय इतर अनेक शिष्य त्यांनी घडवले. नवोदित गुणवंताना वाव देण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. नवोदित कलाकारांच्या स्पर्धा आयोजित करणे, त्यांच्या कॅसेट व सीडीज स्वतः रेकॉर्ड करून घेऊन त्या प्रदर्शित करणे आदी अनेक प्रकारे प्रोत्साहन दिले.
शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विदुषी एन. राजम यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे. शास्त्रीय गायन व वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताला सन २०१२-१३ पासून भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. श्रीमती किशोरी आमोणकर, पं. जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं. राम नारायण, श्रीमती परविन सुलताना, श्रीमती माणिक भिडे, पं केशव गिंडे, पं. अरविंद परिख यांसारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.