राज्यपालांवर यशोमती ठाकूर यांची घणाघणीत टीका


सांगली : राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर आज घणाघाती टीका केली आहे. कृषी महाविद्यालय सांगली जिल्ह्यात व्हावे मागील काही वर्षापासूनची मागणी आहे. पण एक विक्षिप्त माणूस राज्याच्या राज्यपालपदी बसला असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टीकेवर भाजपने सध्यातरी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याचबरोबर ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सांगलीत कृषी महाविद्यालय होण्यासाठी अडथळा आणत असल्याचा आरोप देखील केला आहे. आमदार विक्रम सावंत यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात यशोमती ठाकूर बोलत होत्या, त्यांनी तेव्हा कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की, संविधानाने आम्ही एकत्र जोडलो गेलो आहोत म्हणून एकत्र आलो. पण त्याच संविधानावर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणारा व्यक्ती आज महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून बसला आहे. तिच व्यक्ति अडथळे आणत असल्यामुळेच सांगलीत कृषी महाविद्यालय होत नसल्याचा आरोप देखील यशोमती ठाकूर यांनी केला .

मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, सांगलीत कृषी महाविद्यालय व्हावे, अशी मागील अनेक वर्षांची मागणी होती. पण मला दादांनी सांगितले की तिथे गव्हर्नर म्हणून एक विक्षिप्त माणूस बसलेला आहे. मीडियावाल्यांना हे दाखवायचे असेल तर दाखवा, असे देखील त्या म्हणाल्या.

दरम्यान ठाकूर यांनी यावेळी आमदार विक्रम सावंत यांना विकासाच्या कामात अगदी खांद्याला खांदा लावून मदत करु असा शब्द देखील दिला आहे. त्याचबरोबर मंत्रिमडळाची सदस्य म्हणूनच नाही तर त्यांची बहिण म्हणून त्यांना मदत करेन असे, यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

दरम्यान यशोमती ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की, वेगळा कार्यक्रम महिलांच्या सबलीकरणासाठी घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच पुरुषांना काही या कार्यक्रमाला बोलवणार नसल्याचा टोला देखील त्यांनी बोलताना लगावला. आम्ही जतला दत्तक घेतले असून मंत्रिपद असू अथवा नसू या ठिकाणच्या विकासासाठी जे करता येईल ते करु असेही ठाकूर यांनी नमूद केले. दरम्यान त्यांनी बोलताना उपस्थितांना योजनांची यादी देत त्याचा उपयोग करून घेण्याचे आवाहन देखील केले आहे.