‘बाबा चमत्कार’ या पात्रामुळे प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन


पुणे – महेश कोठारे दिग्दर्शित ‘झपाटलेला’ या मराठी चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ हे पात्र साकारुन प्रसिद्धीच्या झोतात आलेले ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे आज सायंकाळी पुण्यात वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. कडकोळ हे अभिनेता आणि लेखक होते. मराठी चित्रपट, नाटक यांसह दूरचित्रवाहिनी मालिकांतून त्यांनी अभिनय केला आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

कृष्णधवल चित्रपटातून राघवेंद्र कडकोळ यांनी आपल्या अभिनयाला सुरूवात केली होती. कडकोळ हे प्रामुख्याने ‘झपाटलेला’ या चित्रपटातील ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका साकारल्याने ते जास्त प्रसिद्धीझोतात आले होते. राघवेंद्र कडकोळ यांनी ‘अश्रूंची झाली फुले’, ‘रायगडला जेव्हा जाग येते’ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांची ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिकाही प्रचंड गाजली. ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘कुठे शोधू मी तिला’, ‘गौरी’, ‘सखी’ या मराठी चित्रपटांमध्ये, तर ‘छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटात काम केले आहे. कडकोळ यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तकही लिहीले आहे. चित्रपट, नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.