इराणचा पाकिस्तानात घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक’


लाहोर – पाकिस्तानला इराणने जोरदार झटका दिला असून पाकिस्तानात घुसून इराणने ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला आहे. पाकिस्तानची जगभरात दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश अशी ओळख असल्यामुळेच भारत आणि अमेरिकेने यापूर्वी पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक केले होते. कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये खात्मा केला होता, तर उरी सैन्य तळावरील हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइकची कारवाई केली होती, यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.

पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करुन इराणने कैदेत असलेल्या आपल्या सैनिकांची सुटका केली. या आठवड्यात इराणने हा सर्जिकल स्ट्राइक केला असून पाकिस्तानात हे ऑपरेशन इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड या एलिट फोर्सने गुप्तचर माहितीच्या आधारावर करुन, आपल्या दोन सैनिकांची सुटका केली. ही माहिती रिव्होल्युशनरी गार्डसने दिली आहे. दोन सैनिकांची मंगळवारी रात्री केलेल्या या यशस्वी ऑपरेशनमध्ये सुटका केल्याचे आयआरजीसीकडून सांगण्यात आले.

अडीच वर्षांपूर्वी जैश-उल-अदल या दहशतवादी संघटनेने इराणच्या दोन सैनिकांचे अपहरण करुन त्यांना बंधक बनवले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसनी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ऑपरेशन करुन त्यांची सुटका केली. १६ ऑक्टोबर २०१८ रोजी इराण-पाकिस्तान सीमेवरुन पाकिस्तानातील वाहाबी दहशतवादी संघटना जैश-उल-अदलने १२ आयआरजीसीच्या सैनिकांचे अपहरण केले होते. इराण आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी या सैनिकांच्या सुटकेसाठी समिती बनवली होती.

पाच सैनिकांची १५ नोव्हेंबर २०१८ ला सुटका करण्यात आली. तर पाकिस्तानी लष्कराने २१ मार्च २०१९ ला चार इराणी सैनिकांची सुटका केली. जैश-उल-अदलला इराणने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. इराणमध्ये राहणाऱ्या बलोच सुन्नींच्या अधिकारांच्या रक्षणासाठी जैश-उल-अदलच्या इराण सरकारविरोधात कारवाया सुरु असतात.