१६ फेब्रुवारीला नवी मुंबई, वसई- विरार व कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी


मुंबई : नवी मुंबई, वसई – विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच इतर विविध 16 महानगरपालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 3 मार्च 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 8 मार्च 2021 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर 12 मार्च 2021 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती मदान यांनी दिली.

विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी (कंसात कारण): नाशिक- 4अ (निधन), धुळे- 5ब (राजीनामा), परभणी- 11ब (निधन), 14क (निधन), ठाणे- 30अ (जात प्रमाणपत्र अवैध), 15ड (निधन), 23ड (निधन), अहमदनगर- 9क (अनर्ह), नांदेड वाघाळा- 13अ (निधन), नागपूर- 8ब (जात प्रमाणपत्र अवैध), मीरा भाईंदर- 10ड (निधन), मालेगाव- 20क (निधन), पिंपरी चिंचवड- 1ड (निधन), 14अ (निधन), 4ब (निधन), उल्हासनगर- 14ड (निधन), 8क (निधन) सोलापूर- 6क (निधन), सांगली मिरज कुपवाड- 16अ (निधन), अकोला- 4अ (निधन), 8क (निधन), 3क (निधन), भिवंडी निजामपूर- 9ब (राजीनामा), पुणे- 8क (निधन) आणि 29ब (निधन).