
मुंबई – कालपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून मुंबईतील चाकरमान्यांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अखेर सुरू करण्यात आली. पण काही वेळा प्रवासासाठी निर्धारित करुन देण्यात आल्या आहेत. मुंबईकरांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असताना एक महत्वाचे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
राजेश टोपेंचे आश्वासन; सर्वसामान्यांच्या सोयीनुसार करण्यात येणार लोकलच्या वेळा
लवकरच लोकल सेवेच्या वेळापत्रकात लोकांचे हित आणि गरज पाहून सर्वसामान्यांच्या सोयीनुसार आवश्यक बदल करण्यात येतील, असे राजशे टोपे मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. कालपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबईची लोकल सेवा सुरू झाली असली, तरी पहाटे पहिल्या लोकलपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ नंतरच सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्यामुळे सकाळी ७ नंतर ते दुपारी १२ पर्यंत आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सर्वसामान्यांना प्रवास करता येत नाही. मुंबईकरांकडून शासनाच्या या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
आरोग्यमंत्र्यांनी मुंबईकरांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत लवकरच नागरिकांना दिलासा दिला जाईल, अशी माहिती दिली आहे. लोकलची व्यवस्था ही सर्वांसाठीच अतिशय महत्वाची आहे. लोकलच्या वेळात काही सुधारणा होण्यासारखी असेल तर नक्कीच आमच्या विभागाकडून आम्ही याचा पाठपुरावा करू. शेवटी लोकांचे हित हाच सर्वात महत्वाचा विषय आहे. जनतेची गरज आणि हित ओळखूनच सरकार निर्णय घेईल, असे राजेश टोपे म्हणाले.
