राम मंदिरासाठी जमा केलेल्या वर्गणीतून दारू ढोसतात भाजपचे नेते : काँग्रेस आमदार


भोपाळ: राम मंदिरावरून माजी केंद्रीय मंत्री आणि झाबुआ येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार कांतिलाल भूरिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजप नेते राम मंदिराच्या नावाने वर्गणी जमा करतात आणि त्या पैशातून संध्याकाळी दारू ढोसतात, असे वादग्रस्त वक्तव्य कांतिलाल भूरिया यांनी केले असून त्यावरून आता संताप व्यक्त केला जात आहे.

कांतिलाल भूरिया यांनी हे वादग्रस्त वक्तव्य मध्यप्रदेशातील पेटलावद येथे एका धरणे आंदोलनादरम्यान केले. दोनदा केंद्रीय मंत्री, 5 वेळा खासदार भूरिया हे राहिलेले आहेत. ते सध्या आमदार आहेत. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येत असून त्यासाठी संपूर्ण देशातून विश्व हिंदू परिषद आणि भाजपने वर्गणी जमा करण्यास सुरुवात केली आहे. हे राष्ट्रव्यापी अभियान दोन्ही संघटनांनी हाती घेतले असून स्वेच्छेने लोकांकडून वर्गणी घेतली जात आहे. त्यातच कांतिलाल भूरिया यांनी वादग्रस्त वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे. भूरिया यांच्या या वक्तव्यावर मध्यप्रदेशातून संताप व्यक्त केला जात आहे.

काँग्रेसेनेही राम मंदिरासाठी मध्यप्रदेशात वर्गणी जमा करण्यास सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे आमदार पी. सी. शर्मा यांनीही वर्गणी जमा करण्यास सुरुवात केली आहे. राम मंदिर पूर्ण होणे म्हणजे राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण होण्यासारखच असल्याचे शर्मा म्हणाले होते.

दरम्यान राम मंदिर निर्मितीचे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही स्वागत केले होते. अयोध्येत राम मंदिर व्हावे, असे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाही वाटत होते, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही मंदिरासाठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली होती.