अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात एक चांगली बातमी


मुंबई : आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात आर्थिक वर्ष 2021-22 यावर्षातील अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी एक चांगली बातमी समोर आली आहे. 1.20 लाख कोटी रुपयांचा जीएसटी जानेवारीमध्ये गोळा झाला आहे. गुड्स अॅन्ड सर्विसेस टॅक्स म्हणजेच, जीएसटी लागू झाल्यानंतरचा हा सर्वाधिक आकडा आहे. 1.15 लाख कोटी रुपये एवढा जीएसटी गेल्या महिन्यामध्ये गोळा झाला होता. तर गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत 10 हजार कोटी रुपयांचा अधिक महसूल गोळा झाला आहे.

अर्थमंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1,19,847 कोटी रुपये एवढा जीएसटी सरकारी तिजोरीत गोळा झाला आहे. यापैकी CGST 21,923 कोटी रुपये एवढा आहे. तर SGST 29,014 कोटी रुपये इतका, तर IGST 60,288 कोटी रुपये एवढा आहे. डिसेंबरपासून 21 जानेवारीपर्यंत 90 लाख GSTR-3B रिटर्न दाखल करण्यात आला आहे.

सलग गेल्या चार महिन्यांपासून जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटी रुपयांहून अधिक असल्यामुळे अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजी मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. बनावट बिलिंग विरोधात ठेवण्यात आलेली पाळत, जीएसटी, इनकम टॅक्स आणि कस्टम आयटी सिस्टममधून मिळालेल्या डेटाचे डीप अॅनालिटिक्स आणि टॅक्स प्रशासन प्रभावी झाल्यामुळेही टॅक्स कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे.

दरम्यान, जीएसटीचा महसूल आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 12 पैकी 8 महिन्यांमध्ये एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. दरम्यान, चालू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जीएसटी महसूलावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये 32,172 कोटी रुपये गोळा झाले असून हा अत्यंत कमी गोळा झालेला जीएसची महसूल आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्येही दिलासा मिळाल्याने यात सुधारणा झाली.