नगर – कोरोनाचा प्रादुर्भाव भलेही कमी झाला असला, तरी धोका अद्याप कायम आहे. कोरोनाचा उपद्रव टाळण्यासाठी जगात आणि देशातील अनेक राज्यांमध्ये उपाययोजना राबवल्या जात आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबर कोरोनाच्या धोक्याबाबत काळजी महाराष्ट्र सरकारकडूनही घेतली जात आहे. पण तरीही नागरिकांकडून अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये झालेल्या एका सभेत याच गोष्टीवरून कोरोनाचा विसर पडलेल्यांना सुनावले.
कोरोनाचा विसर पडलेल्या नागरिकांची अजित पवारांनी काढली खरडपट्टी
शनिवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार होते. अजित पवार यांच्या हस्ते राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन झाले. अजित पवारांनी यावेळी बोलत असताना कोरोनाचा विसर पडलेल्या नागरिकांची खरडपट्टी काढली.
अनेक नागरिक कार्यक्रम सुरू असताना मास्क न लावता आले होते. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरत होते. अजित पवार यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी भाषण करताना कोरोनाची आठवण करून देत सुनावले. व्यासपीठावरून बोलताना मास्क न लावलेल्या नागरिकांकडे अंगुली निर्देश करत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. हे बघा पठ्ठे विनामास्कचे आले आहेत, फिरत आहेत. आता यांच्यापुढे काय डोक फोडून घ्यायचे का?, असे म्हणत अजित पवारांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना सुनावले. कोरोनाची दुसरी लाट ब्रिटनमध्ये आली असून, परिस्थिती गंभीर असल्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
अजित पवार यांनी केंद्र सरकारला लॉकडाउन आणि आर्थिक विकासदर या मुद्द्यांवरून लक्ष्य केले. कोरोनाच्या काळात सरकारी तिजोरीत पैसे येणे कमी झाले. त्यात केंद्र सरकारकडून राज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. पण तरीही राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीत उपलब्ध असलेल्या पैशांतून कामे सुरू ठेवल्याचे अजित पवार म्हणाले.