असे असावे आकर्षक व्यक्तिमत्व

personality
एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याच्या बाह्यरूपावरून दिसून येतच असते, पण त्याही पेक्षा अधिक, या व्यक्तीचे इतरांशी वर्तन आणि विचारसरणी कशी आहे, यावरूनही ठरत असते. दिसायला आकर्षक, पण जर विचारसरणी स्वार्थी असेल, तर अश्या व्यक्तींची लोकप्रियता फार काळ टिकून राहणारी नसते. त्यामुळे बाह्यरूपासोबतच आपले वर्तन आणि विचारसरणी कशी आहे, यावरही इतरांचे तुमच्याबद्दलचे मत अवलंबून असते. चांगल्या वर्तनामुळे आणि सकारात्मक विचारसरणीमुळे आत्मविश्वास बळावण्यासही मदत होत असते. तसेच अश्या व्यक्तीचा मित्र परिवार मोठा असतो, आणि या सर्वांचा सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या कार्यक्षमतेवरही होत असतो. आपले व्यक्तिमत्व देखील इतरांना आकर्षक वाटावे या करिता काही सवयी अंगिकारणे अगत्याचे आहे.

आपण काम करीत असलेल्या ठिकाणी किंवा घरामध्ये देखील इतरांबद्दल नकारात्मक मते व्यक्त करणे टाळायला हवे. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाविषयी तक्रार असेलच, तर तो प्रश्न शक्यतो सामोपचाराने, परस्परांशी बोलून सोडवावा. तसेच त्याविषयी इतरांशी वारंवार चर्चा करणेही टाळायला हवे. प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक दृष्टीकोन असायला हवा. एखादी अडचण उद्भविल्यास त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढता येईल हे पाहावे, आणि तशी मदत आवश्यक असल्यास इतरांना ही करावी. ज्या व्यक्ती मानसिक आधार देणाऱ्या, टोकाची मते व्यक्त न करणाऱ्या आणि मदतीस तत्पर असतात, अश्या व्यक्तीचा आधार इतरांना जास्त वाटत असतो.

सतत काही तरी नवीन करून पाहण्याची आवड असणाऱ्या, उत्साही, हसतमुख मंडळींचा सहवास नेहमीच आनंद देणारा ठरतो. अश्या व्यक्ती सतत काही तरी नाविन्यपूर्ण करण्यासाठी इतरांना देखील प्रेरणा देत असतात. अश्या व्यक्तींचा दैनंदिन सवयीच्या गोष्टींबद्दल किंवा कामाबद्दल तक्रारीचा सूर असत नाही. सकारात्मक दृष्टीकोण असलेल्या व्यक्ती आपल्या सहवासातील सर्वच व्यक्तींना आपलेसे करून घेत असतात.

Leave a Comment