घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेताना…

pets
घरामध्ये कुत्रा, मांजर किंवा अन्य पाळीव प्राणी असणे, ही एक तऱ्हेची मोठी जबाबदारीच असते. घरामध्ये असलेले कुत्रे किंवा मांजर, किंवा अन्य पाळीव प्राणी प्राणी असून देखील घरातील इतर सदस्यांच्या इतकेच महत्वाचे असते. या पाळीव प्राण्यांचा घरातील माणसांवरही विशेष जीव असतोच. अनेकदा अनवधानाने आपल्या हातून घडलेल्या लहानश्या गोष्टी या प्राण्यांसाठी अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे घरातील या चतुष्पाद सदस्याची काळजी घेताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

घरातील पाळीव प्राण्याला घरामध्ये शिजविलेले अन्न खाऊ घालणे हा पर्याय चांगला असला, तरी प्राण्याच्या आरोग्यासाठी सर्व पोषणमूल्ये या अन्नामध्ये असतीलच असे नाही. तसेच आपण खातो ते सर्वच अन्नपदार्थ प्राण्यांसाठी योग्यही असत नाहीत. त्यामुळे प्राण्यांसाठी सर्व पोषक तत्वांनी परिपूर्ण अशी ‘पेट फुड्स’ आता बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. पण ही फूड्स निवडताना त्याचा ब्रँड चांगला आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. तसेच पॅकेटवरील एक्सपायरी डेट तपासून मगच पेट फूड खरेदी करावे. या पेट फुड्स वरील लेबल व्यवस्थित वाचून घेऊन त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ‘फ्लेव्हरिंग एजंट्स’, म्हणजेच पदार्थांच्या चवीसाठी वापरण्यात येणारे कृत्रिम पदार्थ, कॉर्न किंवा जीएमओ (genetically modified organisms) अश्या प्रकारच्या तत्वांचा समावेश नाही याची खात्री करून घेऊन मगच पेट फूड खरेदी करावे.

घरातील पाळीव प्राण्यांना काही ठराविक काळाने व्हेटर्नरी तज्ञांकडे नेणे आवश्यक आहे. तसेच प्राण्यांचे आवश्यक लसीकरण डॉक्टरांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची काळजी घ्यावी. लसीकरण वेळेवर झाले असले, तर या प्राण्यांमध्ये दिसून येणारे आजार उद्भविण्याचा धोका पुष्कळ अंशी कमी होतो. प्राण्यांच्या त्वचेची आणि दातांची काळजी घेणे ही तितकेच महत्वाचे आहे. आजकाल खास प्राण्यांसाठी टूथपेस्ट आणि टूथब्रश बाजारामध्ये सहज उपलब्ध आहेत. तसेच प्राण्यांच्या आंघोळीसाठी देखील खास शँपू आणि साबण बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यांचा वापर प्राणी लहान असल्यापासूनच केला जावा. घरातील प्राणी आपण होऊन रहदारीच्या रस्त्यावर जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. जर स्वतंत्र, बैठे घर असले, तर जिथे कुंपण असेल, तिथे प्राण्यांना मोकळे सोडावे.

घरातील पाळीव प्राण्यांचे, घरातील बाहेरच्या व्यक्तींशी ‘सोशल इंटरॅक्शन’ अतिशय महत्वाचे असते. त्यामुळे घरामध्ये पाहुणे आल्यानंतर प्राण्याला एखाद्या खोलीत बंद न ठेवता, जर पाहुण्यांची हरकत नसेल, तर त्याला देखील पाहुण्यांना भेटू द्यावे. जर प्राण्यांना सतत एकटे, बांधून ठेवले, तर हे प्राणी चिडचिड्या स्वभावाचे आणि त्यामुळे धोकादायक ठरू शकतात. या प्राण्यांचे, विशेषतः कुत्र्यांचे शारीरिक स्वास्थ्य चांगले राहावे या करिता त्यांना देखील नियमित व्यायामाची गरज असते. त्यामुळे जिथे त्यांना मोकळेपणाने धावता येईल अश्या ठिकाणी त्यांना फिरण्यास घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच बाहेर फिरायला नेल्यानंतर इतर पाळीव प्राण्यांच्या संपर्कामध्ये त्याला येऊ द्यावे. प्राण्याच्या गळ्यामध्ये असलेला पट्टा कितपत घट्ट आहे हे वेळोवेळी तपासून पाहावे. आपले एक बोट पट्ट्यामधून जाऊ शकेल इतपत घट्ट पट्टा असावा.

Leave a Comment