वजन घटविण्यासाठी ‘हे’ रस आहेत आरोग्यदायी

juices
वजन घटवून ते नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी योग्य व्यायामाच्या जोडीने योग्य आणि चौरस आहारही घेण्याची आवश्यकता असते. तसेच वजन घटविण्यास सहायक असे काही नैसर्गिक ‘स्टीम्यूलंटस्’ किंवा प्रेरके या कामी उपयुक्त ठरू शकतात. ही नैसर्गिक प्रेरके म्हणजे ताज्या भाज्यांचे किंवा फळांचे रस. या रसांच्या सेवनाने वजन घटण्यास मदत होतेच, त्याशिवाय शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळून शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि एकंदर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
juices1
ताज्या रसांमधून शरीराला आवश्यक फायबर, क्षार, जीवनसत्वे आणि मुख्य म्हणजे अँटी ऑक्सिडंटस् चा भरपूर पुरवठा होत असतो. या मुळे शरीराची चयापचय शक्ती वाढून वजन घटण्यास मदत होत असते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये ताज्या भाज्या आणि फळांच्या रसांचा समावेश केला जाणे आवश्यक ठरते. त्यातल्या त्यात काही भाज्यांचे रस वजन घटविण्यास विशेष सहायक आहेत. या रसनाची चव म्हणावी तितकी चांगली नसली, तरी आरोग्याच्या दृष्टीने या रसांचे सेवन लाभकारी ठरते.
juices2
कारल्याचा रस चवीला काहीसा कडू लागत असला, तरी वजन घटविण्याच्या दृष्टीने हा रस सर्वात उत्तम म्हणायला हवा. या रसाच्या नियमित सेवनाने लिव्हरमधून बाईल अॅसिड्स सक्रीय होतात, व त्यामुळे शरीराची चयापचय शक्ती वाढते. कारल्यामध्ये कर्बोदके कमी असून, परिणामी कॅलरीज देखील अतिशय कमी असतात. कारल्याच्या रसाप्रमाणेच वजन कमी करण्याच्या दृष्टीने काकडीचा रस देखील फायदेशीर आहे. मात्र काकडीचा रस काढण्यापूर्वी काकडी कडू तर नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. कडू पडलेल्या काकडीच्या रसाचे सेवन अपायकारक ठरू शकते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यामुळे भूक लवकर शमते, व त्यामुळे अन्नाचे अतिसेवन टाळण्यास मदत होते.
juices3
आवळ्याचा रस शरीराची चयापचय शक्ती वाढविण्यास तसेच रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यास सहायक आहे. शरीराचे पचनतंत्र सुरळीत ठेवण्यासही हा रस उपयुक्त आहे. या रसामध्ये चवीला शक्यतो साखरेचा वापर करणे टाळावे. त्याऐवजी चवीला थोडासा मध घालावा. मध नैसर्गिक ‘स्वीटनर’ आहे, व आरोग्याच्या दृष्टीने याचे सेवन लाभकारी आहे. नियमित व्यायाम आणि योग्य आहार यांना ताज्या, नैसर्गिक रसांची जोड दिली तर वजन घटेलच, शिवाय त्यावर नियंत्रण ठेवणे ही त्रासाचे होणार नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment