ठाकरे सरकारला चिंता नक्की कोणाची… जनतेची की बारवाल्यांची? – राम कदमांचा सवाल


मुंबई – सर्वसामान्यांसाठी अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुंबई लोकल सेवा पुन्हा सुरू होणार आहे. ठाकरे सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा दिला आहे. कोरोनामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती, पण काही ठराविक वेळेत १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परंतु सरकारने दिलेल्या वेळांवरून आता राजकारण रंगू लागले आहे. यावरुन भाजपे नेते राम कदम यांनी तर बोचरी टीका करत सरकारला बारवाल्यांची जास्त चिंता आहे का? असा स्पष्ट सवाल केला आहे.

जर मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने पाच महिन्यांपूर्वी घेतला असता तर लाखो लोकांना होणारा त्रास वाचला असता. हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यादेखील वाचल्या असत्या. पण सरकारच्या निष्काळजीपणामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मंदिरे उघडण्याआधी बार उघडण्यासाठी परवानगी देणारे सरकार सामान्य प्रवाशांना रात्री साडे नऊनंतर लोकल प्रवासासाठी परवानगी देत आहे. साडे नऊनंतर लोकल ट्रेनचा फायदा नक्की कोणाला? सर्वसामान्य जनतेला की बारवाल्यांना? असा सवाल राम कदम यांनी केला.

नक्की कोणाची चिंता महाराष्ट्राच्या सरकारला आहे. जनतेची की बारवाल्यांची? सर्वसामान्य जनतेला सरकारच्या अशा निर्णयांमुळे सातत्याने विविध संकटांचा सामना करावा लागत आहे आणि त्रास भोगावा लागतो आहे. त्यामुळे हे सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत गंभीर कधी होणार? असा सवाल राम कदम यांनी केला.