मित्र निवडताना चांगले मित्र निवडा, कारण मित्रच बरबाद करतात – अजित पवार


पुणे : पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी मित्रांशी गप्पा मारताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, पण आई वडिलांचे नावलौकिक करा, असा सल्ला दिला. त्यांच्यामुळे तुमच्या चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा, विश्वासार्हता संपली की माणूस संपतो. मित्र निवडताना चांगले मित्र निवडा, कारण ते मित्रच आपल्याला बरबाद करतात, असे वक्तव्यही अजित पवार यांनी केले.

त्याचबरोबर तुम्ही राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलो आणि अडकून पडलो आहे. कुठे जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, असेही अजित पवारांनी यावेळी हसत सांगितले. तसेच आम्ही कधीपर्यंत खुर्चीवर, तर जनतेने सांगितले तोपर्यंत. जनता म्हटली घरी बसा, की चाललो आम्ही. पण सीईओ बघा. जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खुर्चीवर असतो. शिवाय प्रमोशन होत जाते. अभिनेता, कला, संगीत, पत्रकारिता अशी वेगवेगळी क्षेत्र निवडू शकता, असा मोलाचा सल्ला देखील अजित पवारांनी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या महामारीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नवे माध्यम स्वीकारले पाहिजे. ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, पण कोरोना अजून गेलेला नसल्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन देखील अजित पवार यांनी यावेळी केले. मला खूप जण भेटतात. कोरोनामुळे आमची नोकरी गेल्याचे सांगतात. त्यामुळे मुलांनो करिअर निवडताना विचार करा, आपल्या वडिलांना विचारा, असे अजित पवारांनी सांगितले.