मराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे – सुभाष देसाई


मुंबई : मराठी भाषेतील साहित्य निर्मितीतील योगदानाबद्दल पुरस्कारप्राप्त सर्व विजेत्यांचे अभिनंदन करित असतानाच या साहित्यिकांकडून मराठी भाषा संवर्धन व वृद्धी यासाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची सांगता झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या ३४ पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे, कला शिक्षक गोपाल वाकोडे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले उपस्थित होते.

मराठी भाषा मंत्री देसाई म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन परस्परसंवादी पुस्तकांची निर्मिती व्हावी. मराठीचे संवर्धनच नव्हे तर मैत्रीपुर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा वृद्धींगत होणे गरजेचे आहे.

मंत्रालयातील लेखकांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाची संकल्पना लोकांच्या पसंतीस उतरली आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेतून स्वाक्षरी करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणारे कला शिक्षक वाकोडे गुरुजी यांचेही काम उल्लेखनीय असल्याचे देसाई यांनी सांगितले.

मराठीचा प्रचार आणि प्रसारासाठी समाजमाध्यमाचा वापर – प्राजक्ता लवंगारे – मराठी भाषेचा प्रसार व प्रचार व्हावा. यासाठी मराठी विभाग कार्यरत असून मराठीचा वापर जास्तीत जास्त समाज माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच एरोली येथील उपकेंद्राच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. मराठी भाषा पंधरवड्यात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात यावे अशी सूचना केली होती. त्या अनुषंगाने पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले, असेही श्रीमती लवंगारे यांनी सांगितले.

सकारात्मक उपक्रम राबवावेत : चेतन तुपे – मराठी भाषा पंधरवडानिमित्त मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, विश्वकोश व माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध कलावंताने या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. त्याबद्दल विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे यांनी सर्वांचे अभिनंदन केले तसेच या माध्यमातून सकारात्मक उपक्रम राबविले जावेत. यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

नविन शब्दांचा समावेश करावा- रणजितसिंह डिसले – सन २०२० चे वैश्विक शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले म्हणाले, मराठी भाषा पंधरवडा यामध्ये सुधारणा करुन मराठी भाषा वृद्धीगंत पंधरवडा करण्यात यावा. समाज माध्यमावर मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त केला जावा. तसेच नवीन शब्दाचा मराठी भाषेमध्ये वापर करण्यात यावा.

मंत्रालयातील लेखकांचे साहित्य प्रदर्शन – मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाची मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी स्टॉलला भेट देवून पाहणी केली. कला शिक्षक गोपाळ वाकोडे यांनी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांना मराठी भाषेतील त्यांच्या स्वाक्षरीचे पाच नमुने दाखवले.

अभिवाचन व साहित्ययात्री स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण – अभिवाचन स्पर्धेतील विजेते संदीप जाधव, नीलिमा जाधव, सोनल स्मिथ पाटील, वासंती काळे, शिल्पा नातू यांना तसेच साहित्य यात्री प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले.