आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप


मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची सांगता 28 जानेवारी रोजी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्य मराठी वाङमय पुरस्कारासह 34 पुरस्कारांची घोषणा यावेळी केली जाणार आहे.

मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी लिहिलेल्या साहित्याचे प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मांडले जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे व इतर सदस्य, या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजित डिसले हे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

दि. 14 जानेवारी पासून सुरु झालेला हा पंधरवडा भरगच्च कार्यक्रमाने संपन्न झाला. राज्य शासनासोबतच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्था, विद्यापिठे, महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थांमधून मराठी भाषा पंधरवडा निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या पंधरवड्याच्या समारोपाच्या निमित्ताने उद्या, दि. 28 जानेवारी 2021 रोजी ‘साहित्ययात्री’ या प्रश्नमंजुषेचे आयोजन केले जाणार आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात हा कार्यक्रम दुपारी 1 ते 3 या वेळेत होईल. अभिवाचन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.