भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर रक्षा खडसेंच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख


मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यावर भाजपला ट्विट करत तात्काळ कार्यवाही करा, अन्यथा सायबर सेल पुढील कारवाई करेल, असे सांगितलं आहे.

भाजपचे BJP.org हे अधिकृत संकेतस्थळ आहे. या भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर सध्या रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख दिसत नाही. तो आक्षेपार्ह उल्लेख तात्काळ हटवण्यात आला आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट जेव्हा पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विट केल्यानंतर या प्रकरणाची लगेचच दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्याचप्रमाणे एबीपी माझा या वृत्तवाहिनीला रक्षा खडसे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यांनी सर्व प्रकारासंदर्भात पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केल्याचे त्यावेळी म्हटले आहे. तसेच हा सर्व प्रकार माझी बदनामी करण्यासाठीही कोणीतरी फोटोशॉप करुन केलेला असावा, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हणाले की, भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसेजी यांचे अपमानजनक वर्णन पाहून धक्का बसला. अशाप्रकारे महिलांचा अपमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. दोषींवर भाजपने तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करेल.


या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, मला यासंदर्भात ज्यावेळी माहिती मिळाली. तेव्हा मी वेबसाईट चेक केली. त्यावेळी असा कोणताही उल्लेख माझ्या नावासमोर नव्हता. हे ज्या लोकांकडून व्हायरल झाले आहे, ते पेज सेव्ह महाराष्ट्र फॉर बीजेपी असे आहे. यासर्व गोष्टी याच पेजवरुन व्हायरल होत आहेत. कदाचित माझी बदनामी करण्यासाठीही कोणीतरी फोटोशॉप करुन हे केले असावे, अशी माझी शंका आहे. एसपींना यासंदर्भात मी माहिती दिली आहे. तसेच पक्षालाही कळवलेले आहे. त्यामुळे सत्य नक्कीच पुढे येईल. यासंदर्भात काही तक्रार करणार का, असे विचारले असता त्यावर रक्षा खडसे म्हणाल्या की, यासंदर्भात माझे काल एसपींसोबत बोलणं झालेले आहे. ते देखील याप्रकरणी माहिती घेत आहेत. पण सध्या सोशल मीडियाचे जग एवढे मोठे झालेले आहे आणि तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे. त्याचा वापर करुन एखादी खोटी गोष्टही खरी केली जाते. मला शंका आहे की, फोटोशॉप करुनच या गोष्टी करण्यात आल्या आहेत.

भाजपच्या वेबसाईटवरील खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखालील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना टॅग करत, वेबसाईट कोण चालवते? असा सवाल विचारला. या प्रकरणाची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली असून कार्यवाहीची मागणी केली आहे. सध्यातरी भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेख हा हटवण्यात आला आहे. त्यामुळे हा तांत्रिक घोळ होता की, कोणी जाणून बुजून केले होते, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळत आहे.