मुंबईवर हक्क सांगणाऱ्या कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांचे प्रत्युत्तर


मुंबई – महाराष्ट्रात कर्नाटकव्याप्त भागात राहणाऱ्या मराठी भाषिक गावांना आणण्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी काल केल्यानंतर या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच मुंबई कर्नाटकाला जोडण्याची मागणी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकाकडून झालेल्या या मागणीला प्रत्युत्तर दिले.

माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. अजित पवार म्हणाले, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केवळ राज्य प्रमुख या नात्याने मुंबईबाबत वक्तव्य केले असून, त्याला कोणताही आधार नाही. हा वाद अनेक वर्षाचा आहे. मुंबईशी कर्नाटकचा संबंधच येत नाही. कर्नाटकातील जनतेला खूश करण्यासाठी तेथील उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क लावला आहे. मराठी भाषिक आमदार आणि महापौर बेळगावमध्ये निवडून यायचे. तेथील बहुसंख्य नागरिकांची महाराष्ट्रात येण्याची मागणीही आहे. नंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. फेररचना करून मराठी भाषिक गाव कानडी भाषिक गावांमध्ये सामील केल्याचे सांगत पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उत्तर दिले.

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद भागात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की, मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. त्यामुळे मुंबईचा कर्नाटकमध्ये जोपर्यंत समावेश केला जात नाही, तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावे, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी यांनी म्हटले होते.