उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील पोलीस मनोरंजन केंद्राचे लोकार्पण


पुणे : शिवाजीनगर येथील पोलीस मनोरंजन केंद्राचे व पोलीस विभागासाठीच्या नऊ वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अनुक्रमे डॉ. जालिदंर सुपेकर, डॉ.संजय शिंदे, अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त अनुक्रमे बच्चन सिंग, प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, स्वप्ना गोरे, पोर्णिमा गायकवाड, सहा. पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, आबा चेमटे आदी उपस्थित होते. तसेच सायबेज कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष अमित गुजवानी, व्यवस्थापक प्रिया पारनेकर उपस्थित होते.

पुणे शहर पोलीस दलाचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी रुपयांचा निधी तसेच महिंद्रा कंपनीची नवीन नऊ स्कॉर्पिओ वाहने प्राप्त करुन दिली. ही वाहने एस्कॉर्ट व पायलट ड्युटीकरिता वापरण्यात येणार आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्य, पाल्य यांना त्यांच्या कलागुणांना वाव देता यावा, कुटुंबातील सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमाकरिता पोलीस दलाची “पोलीस मनोरंजन केंद्र” ही इमारत 15 ऑगस्ट 1959 रोजी पूर्णत्वाला आली. त्यानंतर सन 2005 मध्ये इमारतीचे पहिल्या मजल्यावर वरिष्ठ अधिकारी यांच्याकरिता एकूण 6 विश्रांतीकक्ष तयार करण्यात आले.