भाजप नेत्याचे जनतेला हम दो हमारे पाचचा संकल्प करण्याचे आवाहन


मेरठ – मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये झेंडावंदनानंतर हम दो हमारे पाचचा संकल्प करण्याचे आवाहन भाजप नेत्याने जनतेला केले. भाजपच्या व्यापार विभागाचे उत्तर प्रदेशमधील संयोजक असणाऱ्या विनीत अग्रवाल शारदा यांनी हे आवाहन केले आहे. त्याचबरोबर मुलांना हत्यारे विकत घेणे आणि ती चालवणेही शिकवले पाहिजे, असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.

कुटुंब नियोजनासंदर्भातील नियम जोपर्यंत बनवला जात नाही, तोपर्यंत हम दो हमारे पाचचा संकल्प आपण केला पाहिजे. तसेच जोपर्यंत आपण कुटुंबनियोजनाचा ठोस नियम तयार होत नाही तोपर्यंत हम दो हमारे दोचा सिद्धांत संपवला पाहिजे, असा युक्तीवादही शारदा यांनी केला. शारदा यांनी यावेळेस सरकारलाही आवाहन करताना, आमचे दोन त्यांचेही दोनचा नियम करावा किंवा हम दो हमारे पाचचा संकल्प करावा, असे म्हटलं आहे.

या पाच मुलांना काय काम देण्यात यावे यासंदर्भातही शारदा यांनी आपल्या भाषणामध्ये भाष्य केले. या पाच मुलांपैकी सर्वाधिक शिकलेल्या मुलाला राजकारणात पाठवावे. एका मुलाला मान, मर्यादा आणि प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासाठी हत्यार खरेदी करणे आणि ते चालवणे शिकवावे. एका मुलाला भारतीय लष्करात पाठावे. एकाला व्यापारी करावे आणि एका मुलाला आयएएस किंवा पीसीएस बनवून भारतीयांच्या सेवेसाठी सक्षम करावे, असे शारदा यांनी म्हटले आहे. लोकशाहीसाठी आज अत्यंत पवित्र दिवस असून सरकारने आजच्याच दिवशी सर्वांसाठी हम दो हमारे दोचा नियम बनवावा किंवा आजपासून आपण सर्वांनी हम दो हमारे पाचचा संकल्प अंमलात आणावा, असे शारद आपल्या भाषणात म्हणाले.

शारद यांनी आपल्या भाषणामध्ये रामायणाचाही संदर्भ दिला. महाराज दशरथ यांना चार पुत्र होते. दशरथ यांना चार पुत्र नसते तर आजही रावणाचे राज्य संपुष्टात आले नसते. त्यामुळेच देशात हम दो हमारे पाचची गरज आहे. असे झाले नाही तर भारतमाता पुन्हा एकदा रडेल. भारतमाता पुन्हा एकदा बेड्यांमध्ये अडकेल आणि पुन्हा एका पाकिस्तानची मागणी केली जाईल. त्यामुळेच भारतमातेला प्रमाण करताना मी हम दो हमारे पाचचे समर्थन करतो, असे शारद यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे.