क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजी झाल्याची कबूली


सिडनी – सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील प्रेक्षकांच्या वर्तनाचा अहवाल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) सोपवला असून सिडनीच्या SCG मैदानावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील भारत-ऑस्ट्रेलियामधील तिसरा कसोटी खेळवला गेला होता. टीम इंडियाच्या खेळाडूंवर सिडनीत वर्णद्वेषी शेरेबाजी झाल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अहवालात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी वर्णद्वेषी शेरेबाजीचा केल्याचा, जो आरोप टीम इंडियाच्या खेळाडूंनी केला होता, त्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अहवालातून शिक्कामोर्तब केले आहे.

कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी स्टँडमधील प्रेक्षकांकडून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अन्य भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजी झाली होती. सिराजने हा प्रकार मैदानावरच कर्णधार अजिंक्य रहाणेच्या लक्षात आणून दिला होता. याची अधिकृत तक्रार टीम इंडियाने देखील केली होती.

टीम इंडियाच्या खेळाडूंना मैदान सोडण्याचा देखील पर्याय मैदानावरील पंचांनी दिला होता. पण कर्णधार अजिंक्य रहाणेने खेळाचा आदर करत, सामना पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाची चौकशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेज, तिकीट डाटा आणि प्रेक्षकांची चौकशी सुरु आहे. पण या वर्णद्वेषी शेरेबाजीला जबाबदार असणारे प्रेक्षक अजूनही सापडलेले नाहीत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या प्रेक्षकांवर स्टेडियम प्रवेशबंदीची कारवाई करण्यात येऊ शकते, तसेच पोलिसांकडे सुद्धा हे प्रकरण सोपवले जाईल.