‘पद्मश्री’साठी झाली होती संजय राऊत यांची शिफारस, पण…


मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च पुरस्कारापैकी समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पण तब्बल 98 मान्यवरांची यादी महाविकास आघाडी सरकारकडून केंद्राकडे पाठवण्यात आली होती. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या देखील नावाचा समावेश होता.

केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार 119 जणांना जाहीर करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारकडून या पुरस्कारांसाठी 98 जणांची यादी पाठवण्यात आली होती. पण, यापैकी फक्त एकाच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. उर्वरीत 97 नावावर केंद्र सरकारने फुली मारल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे.

‘पद्मविभूषण’ पुरस्कारासाठी राज्य सरकारकडून उद्योगपती मुकेश अंबानी, सुनील गावस्कर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. तसेच सिंधुताई सपकाळ, ‘सीरम’ इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, स्कायडायव्हर शीतल महाजन, कै. राजारामबापू पाटील व डॉ. मिलिंद कीर्तने यांची नावे ‘पद्मभूषण’ पुरस्कारासाठी सुचावली होती. पण, केंद्राकडून पद्मभूषण ऐवजी पद्मश्री पुरस्कार सिंधुताईंना देण्यात आला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, यशवंतराव गडाख, डॉ. जगन्नाथ दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासह 88 नावे पद्मश्री पुरस्कारासाठी पाठवण्यात आली होती.