राष्ट्रपती पदक विजेत्या राज्यातील ५७ पोलिसांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन


मुंबई :- राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालेल्या राज्याच्या पोलिस, अग्निशमन, तुरुंग सेवेतील अधिकारी, जवानांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. राज्यातील अधिकारी, जवानांना जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदकांनी महाराष्ट्राचा गौरव वाढवला असून हे पुरस्कार अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्तम कामगिरी व उत्कृष्ट सेवा बजावण्यासाठी प्रेरणा देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राष्ट्रपती पोलिस पदक विजेत्यांमध्ये राज्यातील ५७ पोलिसांचा समावेश असून ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक, १३ पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस शौर्य पदक तर ४० जणांना पोलिस पदक जाहीर झाले आहेत. राज्याच्या अग्निशमन सेवेतील चौघांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहेत. तीन तुरुंग कर्मचाऱ्यांची राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदकासाठी निवड झाली आहे.

दैनंदिन जीवनात मानवी संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या नागरिकांना दिले जाणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ राज्यातील तिघांना मिळाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व राष्ट्रपती पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदकांनी राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची गुणवत्ता, ध्येयनिष्ठा पुन्हा एकदा सिद्ध झाली असून पुरस्कार विजेते सर्वजण उत्कृष्ट कामगिरीची परंपरा यापुढेही कायम ठेवतील, इतरांना प्रेरणा देतील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.