केंद्र सरकारने एवढी टोकाची भूमिका घेऊ नये – अजित पवार


पुणे – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले असून पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष उफळला आहे. आंदोलकांकडून ठिकठिकाणी तोडफोड केली जात आहे, तर पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने एवढी टोकाची भूमिका घेऊ नये, जी चुकीची भूमिका शेतकर्‍यांबद्दल घेतली असेल त्याचा मी धिक्कार करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार पुण्यात आयोजित पत्रकार परिषेदत बोलताना म्हणाले, ते एकदम आंदोलन करत नाही. ते पहिल्यांदा सांगतात की, या आमच्या मागण्या, ही आमची भूमिका आहे. तर त्या संबधित राज्यकर्त्यांनी लक्ष घालण्याची गरज असते. पण दिल्ली येथील आंदोलन हे आजचे नसून दीड महिन्यापासून सुरू आहे. त्या दरम्यान दहा-बारा बैठका झाल्या. पण त्या निष्फळ ठरल्या आहेत. त्यावर त्यांनी २६ जानेवारी रोजी आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारला या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राखण्यासाठी खबरदारी घ्यावी लागते. कुठेही गडबड होता कामा नये. याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. अश्रूधुरांचा वापर त्या ठिकाणी का करावा लागला? हे समजायला मार्ग नाही.

एक शेतकरी म्हणून माझे स्वतःच मत आहे की, शेतकर्‍यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. केंद्र सरकारने एवढी टोकाची भूमिका घेऊ नये. जी चुकीची भूमिका शेतकर्‍यांबद्दल घेतली असेल, त्याचा मी धिक्कार करतो. तसेच आम्ही शेतकर्‍यांच्या बाजूने आहोत, हे मी कालपण सांगितले, आजपण सांगतो आणि उद्या देखील हेच सांगेल.