मोठा निर्णय; मोदी सरकारची टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी


नवी दिल्ली – चिनी सैनिकांसोबत लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर अ‍ॅपबंदीची भारताने घेतलेली भूमिका अजून कठोर केली आहे. काही चिनी अ‍ॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपासाठी भारताने बंदी घातली होती. पण ५९ चिनी अ‍ॅप्सवर आता कायमची बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये TikTok, Baidu, WeChat, UC Browser, Club Factory, Mi Video Call (Xiaomi) आणि BIGO Live अशा अनेक मोठ्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

केंद्र सरकारकडून याआधीच या अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने गतवर्षी जूनच्या अखेरीस ज्या २६७ चिनी अ‍ॅप्सवर कारवाई केली होती, त्यामध्ये यांचाही समावेश होता. केंद्र सरकारने आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत चिनी अ‍ॅप्सविरोधात कारवाई केली होती. भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकता तसेच सुरक्षेला या अ‍ॅप्सकडून धोका असल्याचे सांगण्यात आले होते.

डेटा गोळा करणे, त्याची प्रक्रिया, सुरक्षा असे अनेक प्रश्न माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने उपस्थित केले होते. कंपन्या यांची उत्तर देण्यात असमर्थ ठरल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये SHAREit, Likee, Weibo आणि शाओमीच्या Mi Community यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

दोन्ही देशांमध्ये लडाख संघर्षानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर चिनी अ‍ॅप्सविरोधात भारताने कारवाईला सुरुवात केली होती. भारतविरोधी कारवायांसाठी चीन अ‍ॅप्सच्या माध्यमातून डेटाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर केंद्र सरकारने कंपन्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पण त्यांची योग्य उत्तरे न मिळाल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.