अखेर वाहतुकीसाठी खुला झाला बहुप्रतिक्षित पत्रीपूल


कल्याण – आज अखेर कल्याण आणि डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या पत्री पुलाचे लोकार्पण करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे हा पूल आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. आदित्य ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते. यातच, या पुलाला भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ‘डॉ अब्दुल कलाम’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आता भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेची निवडणूक काही दिवसांतच असल्यामुळे भाजपने हा पुलाच्या नामांतराचा घाट मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठीच घातल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी या पुलाच्या उद्घाटनापूर्वीच उड्डाणपूल नामकरणासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदेंना यांना पत्र लिहिले आहे. पत्रीपुलाला दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी यात त्यांनी केली आहे.

भारताच्या स्वयंपूर्ण क्षेपणास्त्र मोहिमेचे भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम हे शिल्पकार होते, तसेच ते आजही भारतीय युवा पिढीचे आदर्श आहेत. खासकरून बालगोपाळांसोबत त्यांची विशेष मैत्री होती. कल्याण डोंबिवलीतील दहा हजार शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संपूर्ण जन गण मन कार्यक्रमास त्यांची उपस्थिती आजही आपल्या स्मरणात आहे. एका अर्थाने त्यांचे पदस्पर्श आपल्या कल्याण-डोंबिवली शहरांना लाभले. त्याची चिरंतन स्मृती राहावी म्हणूनच पत्रीपुलास ‘भारतरत्न कलाम सेतू’ असे नाव देण्याची भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमची मागणी असल्याचे आमदार चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. पण आता चव्हाण यांच्या मागणीवर शिवसेना कशा प्रकारची भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असूनही या पुलाच्या लोकार्पण सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून कुणाचीही उपस्थिती नसल्याची चर्चाही येथे सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.