राज्यपाल महोदयांना त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही : शरद पवार


मुंबई : मुंबईत आयोजित संयुक्त शेतकरी कामगार मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेही पवारांनी कान उपटले आहेत. असा राज्यपाल आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिला नाही. अभिनेत्री कंगना राणावतला भेटायला त्यांना वेळ आहे, पण माझ्या कष्टकरी अन्नदाता शेतकऱ्याला भेटायला वेळ नसल्याचे म्हणत टीका केली.

शरद पवार म्हणाले, मला शेतकरी कामगार मोर्चाच्या आयोजकांनी सांगितले की सभेनंतर राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शेतकऱ्यांच्या वतीने एक निवेदन देण्यात येणार आहे. पण असे राज्यपाल महाराष्ट्राच्या इतिहासात आम्हाला भेटले नाही. लाखोंच्या संख्येने मुंबईत शेतकरी येणार आहेत, राज्यपालांना भेटून फक्त निवेदन देणार आहेत. असे असताना राज्यपाल गोव्याला गेले. कंगनाला भेटायला त्यांना वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नसल्यामुळे आता हे निवेदन कुठे आणि कोणाला द्यायचे आणि त्याचे काय करायचे याचा विचार करावा लागेल.

राज्याच्या राज्यपालाची ही नैतिक जबाबदारी होती की त्या राज्यातील कष्टकरी अन्नदाता या ठिकाणी फक्त निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे येत आहे. खरं म्हणजे याला त्यांनी सामोरे जायला हवे होते. पण त्यांच्यात तेवढी सभ्यता नाही. त्यांनी कमीत कमी राजभवनात तरी बसायला हवे होते. पण तेही धैर्य त्यांनी दाखवले नाही. त्यावर मी अधिक बोलू इच्छित नसल्याचेही शरद पवार यांनी राज्यपालांना खडसावले.