ही ऐतिहासिक तथ्ये तुमच्या माहितीची आहेत का?

fact
इतिहासकार त्यांच्या अभ्यासाच्या द्वारे आणि संशोधनाच्या द्वारे अशी अनेक तथ्ये जगासमोर आणीत असतात, जी कधी काळी अस्तित्वात तर होती, पण त्यांचा उल्लेख कोणत्याही इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही. प्राचीन काळी अस्तित्वात असणाऱ्या चालीरीती, समाजव्यवस्था, तेव्हाच्या विविध प्रांतांतील लोकांच्या जीवनशैली, परंपरा आताच्या काळामध्ये आपल्याला समजाव्यात हे त्यांच्या संशोधनाचे उद्दिष्ट असते. ही तथ्ये रोचक आहेत यात शंका नाही. अशीच काहीशी अपरिचित तथ्ये खास ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी.
fact1
अठराव्या शतकातील रशियाचा ‘झार’ पीटर द ग्रेट याची मनोरंजनाची कल्पना काहीशी विचित्र होती. त्याचे व्यक्तिमत्व अतिशय धिप्पाड होते. तब्बल सहा फुट सात इंच उंची असणाऱ्या या झारला खुज्या, बुटक्या व्यक्तींबद्दल विलक्षण आकर्षण होते. एकदा त्याने आपल्या आवडत्या खुज्याच्या विवाहासाठी शहरातील समस्त खुज्यांना पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी पाचारण केले. या सर्व खुज्यांना दालनाच्या मधोमध एका मोठ्या टेबलावर बसविले गेले आणि ते करीत असलेल्या नृत्यामुळे पाहुण्यांचे मनोरंजन झाले. क्वचित प्रसंगी या खुज्यांना मोठ्या केक्स मध्ये लपविल्यानंतर त्यांनी त्या विशालकाय केकमधून अचानक बाहेर मारलेल्या उड्या पाहणे हे झारचे विशेष आवडते मनोरंजन होते.
fact2
२००१च्या अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील दहशतवादी बॉम्ब हल्ल्यांच्या नंतर त्या ठिकाणचा विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आला होता. त्यामुळे तिथे उतरू न शकलेली विमाने गँडर येथे उतरविण्यात आली. त्यावेळी ३८ विमाने गँडर येथे उतरली. पण येथील विमानतळ इतका मोठा नसल्याने इतक्या सर्व विमानांना जाग करून देणे हे तेथील अधिकाऱ्यांच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान होते. हा विमानतळ इतक्या विमानांचा भार पेलण्यास सक्षम नसल्यामुळे काही ठिकाणी धावपट्टी धसली. इतक्या सगळ्या विमानांमधून उतरलेल्या शेकडो प्रवाश्यांचे सामान उतरवून ते प्रवाश्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तब्बल चोवीस तासांचा अवधी लागला. त्या शहरामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व हॉटेल्सच्या रूम्स विमानांचे वैमानिक आणि इतर कर्मचारीदलाकरीता राखीव ठेवण्यात आल्या, तर सार्वजनिक इमारती, प्रवाश्यांच्या करिता विश्रांती गृहांमध्ये परिवर्तीत करण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे, तर स्थानिक रहिवाश्यांनी देखील प्रवाश्यांसाठी आपली घरे खुली केली आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला नाकारीत पाच दिवस या आगंतुक पाहुणे मंडळींचे पुरेपूर आदरातिथ्य केले. या उपकारांची परतफेड म्हणून सर्व प्रवासी मंडळींनी गँडर मधील विद्यार्थ्यांकरिता स्कॉलरशिप फंड जमा करून स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्त केला.
fact3
एकोणिसाव्या शतकामध्ये ओपियम (अफू) निरनिरळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी राजरोस वापरली जात असे. अफूच्या सढळ हस्ते होणाऱ्या वापरामुळे पुष्कळ लोकांना अफूची नशा करण्याचे व्यसन जडत असे. हे व्यसन एकदा जडले, की मग त्यापासून सुटका करून घेणे सहज शक्य होत नसे. डोकेदुखी, डायरिया, अस्थमा, पोटांचे इतर विकार इथपासून ते महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या पोटदुखी साठी देखील अफू औषध म्हणून दिली जात असे. हायपोडर्मिक सिरींजचा वापर करून ओपीयम इंजेक्ट केले जात असल्याने याचा परिणाम लवकर होत असे. अमेरिकन क्रांतीच्या वेळी जखमी सैनिकांसाठी देखील वेदनाशामक म्हणून ओपियमचा वापर केला जात असे. १८९५ सालापर्यंत ओपियमचे व्यसन असलेल्यांची संख्या हाताबाहेर गेली. यामध्ये सुमारे साठ टक्के प्रमाण महिलांचे होते. १८७० नंतर या व्यसनाविरोधात जनजागृती केली जाऊ लागली.

Leave a Comment