शिळ्या पोळीचे सेवन ठरू शकते आरोग्यासाठी लाभकारी

roti
अनेकदा रात्रीच्या भोजनाच्या वेळी केलेल्या पोळ्या शिल्लक राहिल्या, दर दुसऱ्या दिवशी त्या खाल्ल्या जातातच असे नाही. कारण जास्त काळ आधी बनवून ठेवलेले पदार्थ खाल्ले तर ते बाधण्याचा धोका संभवतो अशी सर्वसाधारण समजूत असते, आणि अनेक पदार्थांच्या बाबतीत ती योग्यही आहे. पण आहारतज्ञांच्या मते शिळी पोळी खाणे हे आरोग्याला नुकसानकारक नसून, त्या उलट आरोग्याला लाभकारी आहे. बारा ते सोळा तास आधी बनविलेली पोळी आरोग्याला हानिकारक नाही. पण त्यापेक्षा जास्त काळ ठेवलेल्या पोळ्यांचे सेवन टाळायला हवे. बारा तास आधी केलेली पोळी आरोग्याच्या दृष्टीने लाभकारी, म्हणजेच आदल्या रात्रीच्या जेवणाच्या वेळी केलेल्या पोळ्या दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्या जाऊ शकतात.
roti1
आहारतज्ञांच्या मते शिळ्या पोळीमध्ये पोषक तत्वे मोठ्या प्रमाणावर असतात. यांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते. या शिवायही शिळी पोळी खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. शिळ्या पोळीचे सेवन केल्याने ब्लड ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः ज्यांना मधुमेह आहे, त्यांच्यासाठी शिळी पोळी लाभदायक आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी सकाळच्या नाश्त्यामध्ये शिळी पोळी कुस्करून त्यामध्ये थंड दुध घालून खावी. साखरेचा वापर टाळावा. शिळ्या पोळीचे थंड दुधासोबत केलेले सेवन रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही सहायक आहे.
roti2
ज्यांना सतत अॅसिडीटीचा त्रास होतो अश्यांसाठी देखील शिळ्या पोळीचे दुधासोबत केलेले सेवन उपयुक्त आहे. यामुळे केवळ असिडीटीपासूनच नाही, तर पोटांच्या इतर विकारांपासूनही आराम मिळेल. तसेच गव्हाच्या पोळीमध्ये असणारे फायबर अन्न पचनासाठी देखील सहायक आहे. ज्या व्यक्ती नियमित शारीरिक कसरत किंवा व्यायाम भरपूर करतात, अश्या व्यक्तींसाठी शिळ्या पोळीचे सेवन हे शरीराला त्वरित उर्जा देणारे आहे. ताज्या पोळीच्या मानाने बारा तास आधी बनविली गेलेली पोळी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास सहायक आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड दुधाबरोबर शिळ्या पोळीचे सेवन केल्याने उष्माघात होण्याचा धोका कमी संभवतो.
roti3
शिळ्या पोळीच्या सेवनाने शरीराला त्वरित उर्जा मिळत असल्याने याचा समावेश आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये करावा. त्यामुळे दिवसभरच्या कामासाठी लागणारी उर्जा आपल्याला सहज मिळू शकेल आणि शरीरामध्ये उत्साह आणि चैतन्य टिकून राहण्यास मदत होईल.

Leave a Comment