व्हिडिओ; या शाळेतील सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहिण्यात पटाईत

school
आपल्यापैकी काही जण लिहिण्यासाठी उजव्या हाताचा वापर करतात, तर काही जण डाव्या हाताने लिहितात. मात्र दोन्ही हातांनी तितक्याच सफाईने लिहिता येण्याचे कौशल्य अंगी असणाऱ्या व्यक्ती अभावानेच आढळतात. दोन्ही हातांनी अतिशय सफाईने लिहिता येण्याच्या कौशल्याला इंग्रजीमध्ये ‘अँबिडेक्सटेरिटी’ म्हटले जाते. ही क्षमता फारच कमी लोकांच्या अंगी आहे. शंभरातील एकाच व्यक्तीच्या अंगी हे कौशल्य असते, इतके हे दुर्मिळ आहे.
school1
मात्र मध्य प्रदेशातील सिंग्रौली या ठिकाणी असलेल्या ‘वीणा वादिनी’ या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दोन्ही हातांनी लिहिण्याचे प्रशिक्षण अगदी सुरुवातीपासूनच दिले जाते. या शाळेमध्ये एकूण तीनशे विद्यार्थी असून, हे सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी तितक्याच सफाईने लिहू शकतात. दोन्ही हातांनी लिहिण्याच्या प्रशिक्षणाची सुरुवात विद्याथी पहिलीत असल्यापासूनच सुरु होते. या विद्यार्थ्यांना तिसरीच्या वर्गामध्ये येईपर्यंत दोन्ही हातांनी लिहिण्याचे कौशल्य उत्तम प्रकारे अवगत होते.

(व्हिडिओ सौजन्य-Amazing World )
या शाळेमध्ये दोन्ही हातांनी लिहिण्याच्या कौशल्याव्यतिरिक्त मुलांना सहा निरनिरळ्या भाषांचे प्रशिक्षणही दिले जाते. या भाषांमध्ये रोमन आणि अरेबिक भाषांचा समावेश आहे. इयत्ता आठवीमध्ये पोहोचेपर्यंत हे सर्व विद्यार्थी इतके तरबेज झालेले असतात, की दोन्ही हातांनी लिहिण्याचे कौशल्य त्यांना अवगत असतेच, शिवाय ते दोन वेगवेगळ्या लिपी देखील दोन्ही हातांनी एकाच वेळी लिहू शकतात.

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना दोन्ही हातांनी लिहिण्याचे कौशल्य अवगत होते, आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेत या शाळेमध्ये हे प्रशिक्षण मुलांना देण्यात येत असल्याचे ‘वीणा वादिनी’चे संस्थापक म्हणतात. हे कौशल्य मुलांना अवगत असल्यामुळे तीन तासांची प्रश्नपत्रिका मुले अवघ्या दीड तासामध्ये सोडवू शकत असल्याचेही शाळेचे संस्थापक सांगतात.

Leave a Comment