मानसिक तणावाबरोबरच क्रोधही शांत करणारी शक्ती मुद्रा

mudra
आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक तणाव अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयस्क व्यक्ती सर्वांनाच जाणवितो आहे. सतत स्पर्धा, कामाच्या डेडलाईन्स सांभाळताना घराच्या आणि परिवाराच्या जबाबदाऱ्या सांभाळणे ही तारेवरची कसरत ठरते आहे. अश्या वेळी कधी तरी सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी किंवा घरातील मंडळींशी कोणत्याही गोष्टींवरून होणारे मतभेद, हे मनामध्ये रागाची भावना उत्पन्न करणारे ठरू शकतात. ही भावना मानसिक तणाव आणखी वाढण्याला कारणीभूत ठरू शकते. अश्या वेळी शक्ती मुद्रा सहायक ठरू शकते.
mudra1
शक्ती मुद्रेमुळे शरीरातील सर्व नाडी योग्य प्रकारे काम करू लागतात. त्यामुळे शरीर उर्जावान बनण्यास मदत होते. तसेच यामुळे शारीरक थकवा नाहीसा होऊन मानसिक तणाव कमी होण्यासही मदत मिळते. अधिक शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्ती, ज्यांच्या मनामध्ये सतत नैराश्याचे किंवा नकारत्मक विचार येतात अश्या व्यक्ती, सतत मानसिक तणावाखाली वावरणाऱ्या व्यक्तींसाठी ही मुद्रा विशेष उपयोगी आहे. ज्या व्यक्तींना निद्रानाशाचा विकार आहे, किंवा ज्यांना स्लिप डिस्क, किंवा पाठदुखीची समस्या सतावत आहे, अश्या व्यक्तींसाठी देखील शक्ती मुद्रा विशेष लाभकारी आहे.
mudra2
ही मुद्रा बनविण्यासाठी दोन्ही हातांच्या अंगठ्यांना इतर बोटांमध्ये दबून धरून मुठ आवळून धरावी. त्यानंतर दोन्ही पाय दुमडून जमिनीवर वज्रासनामध्ये बसावे आणि आपल्या दोन्ही हातांच्या मुठी पोटाच्या खाली, नाभी जवळ ठेवून हलका दाब द्यावा. दोन्ही मुठींच्या मध्ये साधारण दोन ते तीन इंच अंतर असावे. यानंतर मन शांत करण्याचा प्रयत्न करीत दीर्घ श्वासोच्छवास करावा. अश्या प्रकारे दररोज किमान पंधरा ते वीस मिनिटे या मुद्रेचा सराव करावा. वज्रासनमध्ये बसणे शक्य नसले तर मांडी घालून बसून ही हा सराव करता येईल.

Leave a Comment