तुम्ही अति तणावाखाली तर नाही ? अशी ओळखा तणावाची लक्षणे

stress
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला आपापले ध्येय साध्य करायचे असते. या धावपळीमध्ये अक्षरशः तहानभूक विसरून काम करणारेही अनेक असतात. यामध्ये केवळ ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांचाच समावेश असतो असे नाही, तर घरामध्ये काम करणाऱ्या गृहिणी, किंवा अगदी शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या जीवनामध्येही पुष्कळ तणाव दिसून येत असतो. या तणावाची लक्षणे काही काळाने शरीरावर, आरोग्यावरही दिसून येऊ लागतात. ही लक्षणे दिसून येताच त्यांच्यावर वेळीच उपचार केल्याने परिस्थिती सुधारतेही, पण मुळात आपण अति तणावाखाली वावरत आहोत हेच मुळी अनेकांच्या गावी नसते. त्यामुळे त्या अति तणावापायी जाणवू लागलेल्या लक्षणांकडेही दुर्लक्ष केले जाते.
stress1
जर मानसिक किंवा शारीरिक तणाव प्रमाणापेक्षा खूप जास्त वाढला, तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर आणि एकंदर आरोग्यावर दिसून येतात. परिणामी अनेक लहान मोठ्या समस्या आणि व्याधी उद्भवू लागतात. पण या समस्यांवर किंवा व्याधींवर वरवर उपचार न करता यांच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक ठरते. या सर्व समस्यांच्या मुळाशी मानसिक किंवा शारीरिक तणाव आहे हे ओळखून हा तणाव नियंत्रित करण्यासाठी वेळीच केलेली उपाययोजना हितकारी ठरते. त्यामुळे तणावाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
stress2
कधी अचानक खूपच केसगळती सुरु होते. अति तणावामुळे हे घडू शकते. त्यामुळे केसगळती प्रमाणाबाहेर वाढली, तर त्यासंदर्भात तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तणावामुळे वजनामध्येही अचानक उतार-चढाव दिसून येतात. तणाव खूप जास्त असेल तर काही व्यक्तींमध्ये भूक अचानक नाहीशी होते, तर काही व्यक्ती तणावाखाली असल्यास, अचानक खूपच जास्त खाऊ लागतात. अचानक भूक वाढणे, किंवा अचानक भूक बिलकुल नाहीशी होणे ही दोन्ही तणावाची लक्षणे आहेत. तणावामुळे शरीराची चयापचय क्रिया मंदावते, आणि त्यामुळे ही वजन वाढू लागते.
stress3
सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीची चिंता करीत राहिल्याने तणावामध्ये आणखीनच भर पडते. अश्या व्यक्ती सतत चिंतेमध्ये, अस्वस्थ असतात, त्यांचा स्वभाव चिडचिडा बनू लागतो. त्यामुळे आपल्या चिंतांच्या विषयी कोणाशी तरी मनमोकळेपणाने बोलणे अश्या वेळी उपयुक्त ठरते. अश्या वेळी काउन्सेलरची मदत घेणेही योग्य ठरते. अतितणावामुळे झोप येईनाशी होते, किंवा अचानक झोप वाढते ही. ही दोन्ही लक्षणे एखादी व्यक्ती ‘ओव्हर स्ट्रेस्ड’ असण्याची आहेत. तणावामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून अचानक मनस्थिती बदलणे, म्हणजेच मूड स्वीन्ग्ज, अंगदुखी, डोकेदुखी, अपचन, अश्या प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. तसेच अति तणावामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती जलद होणे, स्नायू अचानक आखडणे, अल्सर, छातीमध्ये वेदना अश्या प्रकारच्या समस्याही उद्भवू शकतात.

मनावरील अति तणाव कमी करण्यासाठी सतत कामाचा किंवा डेडलाईन्सचा विचार करणे टाळायला हवे. आपल्या आवडत्या छंदांसाठी वेळ द्यायला हवा. तसेच आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालविल्याने, त्यांच्याशी संवाद साधल्यानेही तणाव पुष्कळ अंशी कमी होऊ शकतो. आवश्यकता वाटल्यास तज्ञांची मदतही अवश्य घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment