ही फुले आपल्या आहारात समाविष्ट करणे आरोग्यासाठी लाभकारी

flower
आपल्या आहारामध्ये फळे, भाज्या, डाळी, कडधान्ये इत्यादी पदार्थांचा समावेश आपण नियमितपणे करीत असतो. पण या सर्व पदार्थांच्या सोबत आपण काही फुले देखील आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. ही फुले आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी असून, अगदी सहज उपलब्धही असल्याने यांचा उपयोग आपली आहारात करून पाहणे नक्कीच उपयुक्त ठरेल. ही फुले सरळ आहेत तशीच पदार्थामध्ये टाकता येऊ शकतात, किंवा यांच्या बिया, अथवा बियांपासून पासून बनविलेले तेल स्वयंपाकामध्ये वापरता येऊ शकते.
flower1
सूर्यफुलाच्या तेलाचा वापर आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचा आहे. या तेलामुळे हृदयरोगाची संभावना कमी होऊन पचनतंत्र सुरळीत राहण्यास मदत होते. शरीरातील इंफ्लेमेशन कमी करण्याचे गुणधर्म या तेलामध्ये आहेत. तसेच सूर्यफुलाच्या बिया देखील आरोग्यास अतिशय लाभकारी आहेत. या बिया केवळ कोरड्या भाजून किंवा अगदी कमी तेलावर परतून सॅलडमध्ये घातल्यास त्याचा स्वाद तर वाढेलच, शिवाय आरोग्यालाही त्याच्यापासून फायदा मिळेल. सुर्याफुलाप्रमाणे भोपळ्याच्या फुलांचा वापरही स्वयंपाकामध्ये करता येतो. ही फुले रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांसाठी लाभकारी असून, यामध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे या फुलांचा समावेश आपल्या आहारामध्ये केल्याने केस, नखे, त्वचा यांचे आरोग्य चांगले राहून शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. या फुलांमध्ये बीटा कॅरॉटीन्सही मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी ती उपयुक्त आहेत.
flower2
गुलाबाच्या पाकळ्यांचा गुलकंदामध्ये वापर करून त्याचे सेवन करण्याची पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून रूढ आहे. गुलकंद हा औषधी असून, शरीरातील उष्णता कमी करणारा आहे. तसेच गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या वापरून तयार केलेले गुलाबजल त्वचेसाठी वरदान आहे. गुलाबाच्या पाकळ्या अनेक पदार्थांवर सजावटीसाठी वापरल्या जातात. या पाकळ्यांच्या वापराने पदार्थाला एक आगळीच चव येते. गुलाबाप्रमाणे बडीशेपेच्या फुलांचाही स्वयंपाकमध्ये वापर केला जातो. या फुलांची केलेली भजी अतिशय रुचकर लागतात. पाश्चात्य खाद्यसंस्कृतीमध्येही बडीशेपेच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. या फुलांच्या सेवनाने शरीराची चयापचय शक्ती वाढून त्वचेच्या आरोग्यासाठी देखील ही फुले उत्तम आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment