३१ मार्च अखेर पूर्ण करा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे – अजित पवार


पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्चअखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

येथील ‘व्हीव्हीआयपी’ सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि सोलापूर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर (व्हिसीद्वारे), जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही मार्गांची कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील, असे नियोजन करावे. एखादा प्रकल्प काही कारणांमुळे लांबला तर खर्चात वाढ होते. या दोन्ही मार्गांचे भूसंपादन आणि मावेजा वाटप करण्यात यावे. आवश्यकता भासल्यास विभागीय आयुक्त राव यांनी वेगळी बैठक घेऊन विषय मार्गी लावावा, असे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले. बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.