धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी घेतली मागे


मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या आरोपांमुळे वादात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने मागे घेतल्याचे वृत्त आहे.

रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचे सांगितले. तशाप्रकारे पोलिसांना तिने काल (दि.२१) लेखी निवेदन दिल्याचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे. प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचे रेणू शर्माने म्हटले आहे. रेणू शर्माने काही दिवसांपूर्वीच मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते, असे ट्विट केले होते. त्यानंतर आता तिने तक्रार मागे घेतली आहे.