कँब्रिज अ‍ॅनालिटिकाविरोधात सीबीआयने भारतीयांच्या फेसबुक डेटा चोरी प्रकरणी दाखल केला गुन्हा


नवी दिल्ली – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ब्रिटनची कंपनी कँब्रिज अ‍ॅनालिटिकाविरोधात (Cambridge Analytica) गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा 5.62 लाख भारतीय फेसबुक युजर्सचा डेटा चोरी केल्याच्या आरोपाप्रकरणी दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने याच प्रकरणात युकेमधील अजून एक कंपनी ग्लोबल सायन्स रिसर्चविरोधातही कारवाई सुरू केली आहे.

सीबीआयने कँब्रिज अ‍ॅनालिटिकाविरोधात भारतातील 5.62 लाख फेसबुक युजर्सची गोपनीय माहिती बेकायदेशीरपणे गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती ट्विटरद्वारे एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. सीबीआय फेसबुक-कँब्रिज अ‍ॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यापूर्वीच संसदेत दिली होती.

बेकायदेशीरपणे 5.62 लाख भारतीय फेसबुक युजर्सचा डेटा ग्लोबल सायन्स रिसर्चने गोळा केला आणि हा डेटा कॅब्रिज अ‍ॅनालिटिकासोबत शेअर केल्याचे उत्तर सोशल मीडिया कंपनीने सीबीआयला दिले होते. ग्लोबल सायन्स रिसर्चकडून कँब्रिज अ‍ॅनालिटिकाने अवैधपणे खासगी डेटा घेतल्याचा आणि या डेटाचा वापर भारतातील निवडणुकीवर परिणाम होण्यासाठी केल्याचा आरोप आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया प्लॅटफॉर्म्सनी मार्च 2018 मध्ये कँब्रिज अ‍ॅनालिटिकाचे माजी कर्मचारी, सहकारी आणि कागदपत्रांच्या आधारे पाच कोटीपेक्षा जास्त युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीशिवाय फेसबुक प्रोफाइलवरुन चोरल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर कंपनीने 3 एप्रिल, 2018 रोजी त्यांच्याकडे भारतीयांचा कोणताही फेसबुक डेटा नसल्याचे सांगितले होते. तर, याउलट फेसबुकने भारत सरकारला 5 एप्रिल, 2018 रोजी सांगितले होते की, कँब्रिज अ‍ॅनालिटिकाने इंस्टॉल केलेल्या अ‍ॅपद्वारे जवळपास 5,62,455 भारतीयांचा फेसबुक डेटा हस्तगत केला. आता याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.