२५ जानेवारीपासून कोल्हापूर येथून ‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी’ उपक्रमाची सुरूवात


मुंबई : विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्था, यांचे प्रश्न विविधस्तरावर प्रलंबित आहेत. ते तातडीने सोडवता यावे म्हणून ‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात २५ जानेवारी २०२१ पासून कोल्हापूर येथून करण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांचा दौरा केल्यानंतर लक्षात आले की, विद्यार्थी पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्था यांच्या अडचणींसाठी सर्वांना संचालक, सहसंचालक, विद्यापीठ, मंत्रालय व इतर कार्यालयात जावे लागते. विशेषतः या प्रश्नांसंदर्भात वारंवार विविध प्रशासकीय कार्यालयात भेट देऊनही विषय प्रलंबित असतात आणि यात वेळ जातो. त्यासाठी अनेकांचा वेळ आणि जाण्या येण्यासाठी लागणारे पैसे याची बचत व्हावी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, आपल्या दारी हा अभिनव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण संचालक, तंत्र शिक्षण संचालक या विभागातील सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना एका ठिकाणी आणून विद्यार्थी,पालक यांचे प्रलंबित प्रश्न सोडवता येईल. यामुळे हा उपक्रम राज्यातील प्रत्येक विभागात त्या-त्या विद्यापीठात घेण्यात येणार आहे. याची सुरूवात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून करण्यात येणार आहे. तरी उच्च तंत्र शिक्षण विभागांशी ज्या काही अडचणी आहेत. त्या संदर्भात या अभिनव उपक्रमात सहभागी होतांना आवश्यक ती कागदपत्रे आणि आपल्या समस्यांचे निवेदन घेऊन यावे, असे आवाहनही उदय सामंत यांनी केले.

यामध्ये प्रधान सचिव, आयुक्त राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, संचालक तंत्रशिक्षण संचालनालय, संचालक उच्च शिक्षण, संचालक कला संचालनालय, संचालक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, संचालक ग्रंथालय संचालनालय, सह संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. पुढील विद्यापीठांच्या उपक्रमांच्या तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.