‘तांडव’वरील कारवाई बाबत केंद्र सरकारने पावले उचलावीत ; अनिल देशमुख


मुंबई – आमच्याकडे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘तांडव’ या वेबसीरीजबाबत तक्रार आली असून नियमानुसार त्यावर कारवाई होईल. पण याबाबत केंद्र सरकारने पावले उचलली पाहिजेत, असे मत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘तांडव’ वेबसीरीजबाबत आमच्याकडे तक्रार आली असून त्यावर कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल. पण ओटीटी प्लॅटफॉर्मसवर सध्या कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे याबाबत केंद्र सरकारने कायदा आणला पाहिजे.

अॅमेझॉन प्राइमवर ‘तांडव’ ही वेबसीरीज प्रदर्शित झाली असून यामध्ये हिंदू देवतांबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्य आणि धार्मिक भावना दुखावतील असे भाष्य करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केला असून या वेबसीरीजविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वेबसीरीजविरोधात माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे देखील तक्रार आली असून असे वाद टाळण्यासाठी ओटीटीसाठी सेन्सॉरशीपची मागणी करण्यात आली आहे.