जाता जाता ट्रम्प प्रशासनाचा ‘या’ दोन देशांपासून भारताला सावध राहण्याचा मैत्रीपूर्ण सल्ला


वॉशिंग्टन – लवकरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अवघ्या काही तासांनंतर राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी मावळते राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी दिलेल्या भाषणामध्ये अमेरिकेतील जनतेला संबोधित केले. त्यांनी यामध्ये ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या राजधानीमध्ये कॅपिटॉल हिल येथे झालेल्या हिंसेबद्दल दु:ख व्यक्त केले. तसेच चीनलाही ट्रम्प सरकारने इशारा दिला. याचवेळी ट्रम्प प्रशासनाने मित्रदेश असणाऱ्या भारताला दोन देशांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

भारतासाठी एक खास ट्रम्प सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून काम करणाऱ्या माइक पोम्पिओ यांनी ट्विट केले आहे. पोम्पिओ यांनी यामध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचे आभार मानले आहे. ब्रिक्स लक्षात आहे का?, असा प्रश्न विचारत पोम्पिओ यांनी या ट्विटला सुरुवात केली. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असणारी ब्रिक्स ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद आहे. पोम्पिओ यांनी या ट्विटमध्ये ‘बी’ आणि ‘आय’च्या लोकांना ‘सी’ आणि ‘आर’पासून धोका असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच ब्राझील आणि इंडिया म्हणजेच भारतीय नागरिकांना चीन आणि रशियापासून धोका असल्याचे पोम्पिओ म्हणाले आहेत. ट्र्म्प प्रशासनाच्या काळात भारत आणि अमेरिकेच्या संबंध कायमच मैत्रीपूर्ण राहिले. अनेकदा ट्रम्प आणि मोदी यांनी एकमेकांचे भरभरुन कौतुक केल्याचेही पहायला मिळाले.

जाता जाता चीनला पुन्हा एक दणका अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने दिला. चीनने उइगर मुस्लीमांचा नरसंहार केला आणि हा मानवेविरुद्ध केलेला गुन्हा असल्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे ट्रम्प यांच्या प्रशासनाने म्हटले आहे. पोम्पिओ यांनी झिनजियांगमधील स्वतःचे (चीनचे) धोरण, पद्धती आणि गैरवर्तवणुकीसंदर्भाती विस्तृत माहिती देणारे कागदपत्रांच्या आधारे चीनमध्ये उइगर मुस्लींवर होत असणारा हिंसाचार हा किमान मार्च २०१७ पासून सुरु असल्याचे म्हटले आहे. पोम्पिओ यांनी हि माहिती पत्रकारांशी यासंदर्भात संवाद साधताना दिल्याचे रॉयटर्सने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.

सर्व उपलब्ध माहितींची पडताळी केल्यानंतर मला खात्री आहे की चीनने कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली शिनजियांगच्या पश्चिमेला राहणाऱ्या उझगर मुस्लिमांबरोबरच अल्पसंख्यांकांचा नरसंहार केला असल्याचे पोम्पिओ यांनी म्हटले आहे. माझ्यामते अजूनही हा नरसंहार सुरु असून या माध्यमातून उइगर मुस्लिमांना चीनमधून कायमचे संपवण्याचा चीनचा विचार असल्याचेही पोम्पिओ यांनी नमूद केले आहे.

जागतिक स्तरावर शिनजियांगमध्ये सुरु असणाऱ्या सरकार पुरस्कृत हिंसेवरुन अनेकदा चीनवर टीका झाली आहे. मात्र चीनने कायमच येथे चालवण्यात येणारे कार्यक्रम हे व्होकेशन ट्रेनिंग सेंटर्स म्हणजेच प्रशिक्षण शिबिरे असल्याचा दावा केला आहे. स्थानिकांना नवीन कला आणि कौशल्य शिकवले जात असल्याचा दावा चीनने केला आहे. पण या छावण्यांमध्ये उइगर मुस्लिमांवर अत्याचार केले जात असल्याचा आरोप अनेक देशांनी केला आहे.