येदियुरप्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर; कर्नाटकातील इंचभरही जमीन देणार नाही


बंगळुरू – महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादाचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर पलटवार करत कर्नाटकची इंचभरही जमीन देणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

येदियुरप्पा म्हणाले, सौहार्दपूर्ण वातावरण उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य बिघडवू शकते. उद्धव ठाकरे सच्चे भारतीय म्हणून देशाच्या संघराज्यीय तत्त्वांचा आदर करतील, अशी मला आशा वाटते. दरम्यान, कर्नाटकात काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

दरवर्षी १७ जानेवारीला कर्नाटकातील बेळगाव, कारवार निपाणीसह शेकडो गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करत असलेली महाराष्ट्र एकीकरण समिती ‘हुतात्मा दिन’ पाळत असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सीमा प्रश्नातील हुतात्म्यांना अभिवादन करत म्हणाले होते की, कर्नाटक व्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत.