उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया – शरद पवार


पुणे : उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दि.18 ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत “कृषिक” या कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि तंत्रज्ञान सप्ताहास आज ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, भारतीय अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा(ऑनलाईन), राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, उपसंचालक सुरेश चौधरी, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र पवार व सुनंदा पवार, बायर कंपनीचे डॉ. सुभाष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व सॉलिडारिडार, आशिया या संस्थांमध्ये करण्यात आलेल्या कराराच्या (एमओयु) प्रतीचे हस्तांतरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या 50 वर्षातील वाटचालीविषयी बनविण्यात आलेल्या चित्रफितीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

खासदार शरद पवार म्हणाले, गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिके घेतल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळतो. यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी व फळपिकांचे उत्पादन देखील शेतकऱ्यांनी घ्यायला हवे. शेतीसाठी ‘पाणी’ हा घटक महत्त्वाचा आहे. शेतीसाठी किती प्रमाणात आणि कशा प्रकारे पाण्याचा वापर करायचा याची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक असते. यादृष्टीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर ‘कृषिक’ सप्ताहाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली, असे सांगून खासदार शरद पवार म्हणाले, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विस्ताराचे काम दिवंगत आप्पासाहेब पवार यांनी केले, तर संस्थेत आधुनिकता आणण्यासाठी राजेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले. संस्थेला 50 वर्षे पूर्ण होत असून संस्थेच्या वाटचालीसाठी अनेक मान्यवरांचे सहकार्य मिळाल्याचेही खासदार शरद पवार यांनी आवर्जून सांगितले.