कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर उत्तर प्रदेशातील एकाचा मृत्यू?


लखनऊ – कोरोना प्रतिबंधक लस उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका ४५ वर्षीय वॉर्डबॉयने घेतल्यानंतर त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. त्याचा मृत्य लस घेतल्यामुळेच झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे अद्याप अधिकृतरित्या समोर आलेले नाही. यासंदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.

मृत्यू झालेल्या वॉर्डबॉयचे महिपाल सिंह (४५) असे नाव असून लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी लस घेतल्यानंतर त्याला लगेचच त्रास व्हायला लागला. नाईट ड्युटी संपल्यानंतर त्यांना छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे त्याचबरोबर कफचा त्रास जाणवू लागला. त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

लस घेण्यापूर्वीच त्यांना काहीसा त्रास होत होता. पण, लस घेतल्यानंतर त्यांची तब्येत खूपच बिघडल्याचे महिपाल यांच्या कुटुंबियांनी सांगितले. दरम्यान, याबाबत माहिती देताना महिपाल यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचे शवविच्छेदन केले जणार असल्याचे उत्तर प्रदेशच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ५१ जणांमध्ये नॉर्मल तर एकामध्ये गंभीर साईड इफेक्ट झाल्याचे दिसून आले. या २२ वर्षीय तरुणाची लस घेतल्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने त्याला एम्सच्या आयसीयूत दाखल करण्यात आले. तसेच कोलकात्यात एका ३५ वर्षीय नर्सला लस घेतल्यानंतर आयसीयूत दाखल करण्यात आले. यावर काही वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, लस घेतल्यानंतर प्रकृती बिघडण्याचे हे अॅलर्जीक रिअॅक्शनचे प्रकार असल्यामुळे लसींपासून त्यापासून घाबरण्याचे कारण नाही.