डावखुऱ्या व्यक्तींबद्दल काही रोचक तथ्ये

lefft
एके काळी डावखुऱ्या व्यक्ती दिसल्या, की त्यांच्यामध्ये काही तरी उणीव असल्यासारखे लोक त्यांच्याकडे पहात असत. किंबहुना मुले डाव्या हातचा वापर जास्त करताना दिसली, तर पालक जबरदस्तीने उजवा हात वापरण्यास मुलांना भाग पाडत असत. मुले डावखुरी आहेत, ही पालकांच्या दृष्टीने चिंतेची बाब असे. पण आता जसजसा काळ बदलला, तसतसे डावखुऱ्या व्यक्ती देखील इतरांसारख्या सामान्य बुद्धिमत्ता आणि शारीरिक क्षमता असणाऱ्या व्यक्ती असतात हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आणि लोकांनी देखील ते आता मान्य केले आहे. आजवर अनेक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वे अशी ही होऊन गेली, जी डावखुरी होती, त्यामुळे अश्या लोकांना पाहिल्यानंतर लोकांच्या मनामधून डावखुऱ्या व्यक्तींबद्दलचा आकस आता नाहीसा झाला आहे.
lefft1
जगामधील दहा टक्के जनसंख्या डावखुरी असल्याची माहिती एका सर्वेक्षणाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून, महिलांच्या मानाने पुरुषांमध्ये डावखुरेपणा जास्त आढळून येत असल्याचे वैज्ञानिक म्हणतात. तसेच डावखुरेपणा जेनेटिक किंवा अनुवांशिक असल्याचे अनेकांना वाटते, पण तसे नाही. डावखुरेपणामध्ये अनुवांशिकतेचा वाटा केवळ पंचवीस टक्के इतका आहे. जगामध्ये बहुतेक व्यक्ती उजव्या हाताचा वापर जास्त करणाऱ्या असल्याने बहुतेक यंत्रे त्यांना वापरता येतील अश्या पद्धतीने बनविली जातात. अश्या यंत्रांवर डावखुऱ्या व्यक्ती काम करीत असताना यंत्राची हाताळणी व्यवस्थित करु शकत नसल्याने अपघात होण्याचा धोका संभवतो. जगभरामध्ये दर वर्षी सुमारे अडीच हजार डावखुऱ्या व्यक्ती, उजव्या हाताने वापरण्यात येणाऱ्या यंत्रांवर काम करताना झालेल्या अपघातांमध्ये प्राणाला मुकतात. उजव्या हाताने वापरली जाण्यासाठी बनविण्यात आलेली धारदार, तीक्ष्ण यंत्रे यातील बहुतेक अपघातांना जबाबदार असतात.
lefft2
वेळेआधी, म्हणजेच ‘प्री-मॅच्युअर’ जन्मलेली मुले डावखुरी असण्याची शक्यता जास्त असते असे विज्ञान सांगते. तसेच डावखुऱ्या व्यक्तींचा बुद्ध्यांक सामान्य व्यक्तीच्या पेक्षा जास्त असतो. अल्बर्ट आईनस्टाईन, आयझॅक न्यूटन, चार्ल्स डार्व्हिन, बेन्जामिन फ्रँकलीन या सुप्रसिद्ध व्यक्ती डावखुऱ्या होत्या. अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बराक ओबामा हे देखील डावखुरे आहेत. तसेच कम्प्युटर गेम्स असो, किंवा एखादा खेळ असो, डावखुऱ्या व्यक्ती या सर्वच ठिकाणी जास्त वरचढ असल्याचे वैज्ञानिक म्हणतात. डावखुऱ्या व्यक्ती केवळ अधिक बुद्ध्यांक असणाऱ्या आणि खेळांमध्ये निष्णातच नाहीत, तर अधिक कल्पक बुद्धीच्याही असतात. डावखुऱ्या व्यक्तींमध्ये भीती आणि राग या भावना जास्त प्रकर्षाने दिसून येतात.

Leave a Comment