जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरूवात


नवी दिल्ली: ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि ‘अ‍ॅस्ट्रॅजेनेका’ने विकसित केलेली’कोव्हिशिल्ड’ आणि ‘भारत बायोटेक’ने शासकीय संस्थेबरोबर विकसित केलेली ‘कोव्हॅक्सिन’ या दोन कोरोना प्रतिबंधक लसींचा वापर करून भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आजपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात ही लस ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाशी आघाडीवर राहून मुकाबला करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर ५० वर्षांपेक्षा वयाच्या २७ कोटी ज्येष्ठ नागरिकांना ही लस उपलब्ध करून देण्यात येईल. या लसींची शास्त्रीय माहिती करून घेणे उद्बोधक ठरेल.

कोव्हिशिल्ड
ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडिश औषध उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेली आणि पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादन केलेली ही लस भारतासारख्या देशांसाठी सर्वात उपयुक्त ठरली आहे. खर्च आणि सुविधा यांचा फार मोठा बडेजाव करणे अशा देशांमध्ये काहीसे कठीण आहे.

फायझर आणि मॉडेर्ना लसांमध्ये ‘एमआरएनए’ या आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनाची प्रक्रिया, साठवणूक आणि वापरही अधिक जटील, नाजूक बनले आहेत. त्याची साठवणूक ‘अल्ट्राकोल्ड’ तापमानातं करणे आवश्यक आहे. कोव्हिशिल्ड मात्र, काहीशी कमी प्रभावी असली तरी ती किफायतशीर आहे. तिची साठवण साध्या फ्रिजरमध्ये महिन्यांपर्यंत करता येते.

‘कोव्हिशिल्ड’ तयार करताना चिपांझीनमध्ये सर्दीचा संसर्ग करणाऱ्या विषाणूवरील तुलनेने कमी प्रभावाच्या औषधाचा वापर केला आहे. हे औषध शरिरात जाताच रोगप्रशिकारक यंत्रणेचे लक्ष वेधून घेण्याचे काम करते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचाच वापर करून कोरोनाविरुद्ध सक्रिय करण्याचे काम हे औषध करते.

ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या संशोधकांनी प्रकाशित केलेल्या प्राथमिक निकालानुसार ही लस सुमारे ७० टक्के प्रभावी आहे. होती.

कोव्हॅक्सिन
हैदराबाद येथील भारत बायोटेक आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी विकसित केलेली ही लस सरकारने मंजूर केली आहे.

शरीरात विषाणूला अटकाव करणारी यंत्रणा सक्रीय करण्यासाठी निष्क्रीय विषाणुंचाच वापर करून हे औषध बनविण्यात आले आहेत. निष्क्रिय विषाणूंवर रासायनिक प्रक्रिया करून अथवा उष्णतेने या विषाणूंना निर्जीव केले जाते. ही प्रक्रिया काहीशी किचकट आणि वेळखाऊ आहे.

कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी करण्यापूर्वीच तिच्या तातडीच्या वापरला परवानगी दिल्याने काही तज्ज्ञांचा त्याला आक्षेप आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये लस मानवी शारीसाठी सुरक्षित असल्याची खात्री केली जाते तर तिसऱ्या टप्प्यात त्याचा रोगप्रतिबंधक प्रभाव समजून घेतला जातो. मात्र, या लसीची ही चाचणीचा न झाल्याने ती किती प्रभावी आहे, हे सांगता येत नाही.