करचुकवेगिरी प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून एकास अटक


मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कारवाई सुरु ठेवत दि. १५ जानेवारी २०२१ रोजी अनुज महेश गुप्ता यांस विलेपार्ले, मुंबई येथून अटक केली आहे. अनुज गुप्ता यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे सॅवी फॅब्रिक्स; शिव टेक्सटाईल, शक्ती टेक्सटाईल अशा तीन कंपन्या महाराष्ट्रात तर सुभलिन फॅब्रिक्स व शुभमंगल टेक्सटाईल अशा दोन कंपन्या दादरा व नगर हवेली येथे वस्तू व सेवाकर कायाद्यान्वये नोंदणीकृत आहेत.

या पाच संस्थांच्या माध्यमातून अनुज गुप्ता याने गेल्या चार वर्षात साधारण रू.२७० कोटीहून अधिक रकमेची फक्त देयके खरेदी केल्याचे आढळून आले आहे. कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखविलेल्या या बोगस खरेदी देयकांतून या पाच कंपन्यांनी सुमारे रू.३१ कोटीहून अधिक रकमेचा बोगस Input Tax Credit प्राप्त करून घेतला तसेच रू.११ कोटीहून अधिक रकमेचा प्रत्यक्ष परतावा शासनाकडून प्राप्त केला. सदर कंपन्यांनी E-Way Bill मध्ये नावे दाखविलेल्या विविधवाहतूकदारांनी आपण या पाच कंपन्यांसाठी प्रत्यक्षात मालाची वाहतूक केली नसल्याची कबुली तपासात दिली आहे. तसेच पाच कंपन्यांकडे त्यांनी दावा केलेल्या एकूण मालापैकी फक्त २०% एवढया रकमेचा माल प्रत्यक्ष आढळून आला. उर्वरित ८०% एवढ्या किंमतीचा माल या कंपन्यांकडे प्रत्यक्ष आढळून आला नाही. माल दादरा नगर हवेली येथील गोडाऊनमध्ये ठेवल्याचा दावा अनुज गुप्ता यांनी केल्यामुळे दादरा नगर हवेली वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता ही बाब उघडकीस आली.

अनुज गुप्ता यांस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनुज गुप्ता यांचे हे कृत्य दखलपात्र व अजामिनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा २०१७ नुसार ०५ वर्षापर्यंतच्या तुरुंगवासास पात्र आहे. या सलग तिसऱ्या अटक कारवाईतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे, असे राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.