मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा प्रारंभ: देश आणि शास्त्रज्ञांचे केले कौतुक


नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या कामगिरीबद्दल देशाचे आणि देशातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. लस विकसित करण्यास वर्षानुवर्षे लागतात. परंतु अगदी कमी कालावधीत भारतात आपल्याकडे केवळ दोनच नव्हे तर स्वनिर्मित दोन लस आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

जगात असे काही देश आहेत ज्यांची लोकसंख्याही ३ कोटी एवढी नाही. परंतु भारत पहिल्या टप्प्यात ३ कोटी आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणार आहे. पुढच्या टप्प्यात आम्ही ही संख्या ३० कोटींवर नेऊ..जगभरात भारत, अमेरिका आणि चीन.हे मोठ्या लोकसंख्येचे देश असून भारतात सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे., असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतात तयार केलेल्या लसींबाबत भीती दूर करीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, वैज्ञानिक संक्षेत्रात भारताने विश्‍वासार्हता प्राप्त केली आहे. जगभरातील मुलांना दिलेल्या सुमारे ६० टक्के लसी भारतात तयार होतात. जग भारताच्या लसविज्ञान आणि संशोधनावर विश्‍वास ठेवत आहे, असेही ते म्हणाले.

भारतात तयार झालेल्या लसी किफायतशीर आणि वापरण्यास सोप्या आहेत. विदेशातील काही लसींची किंमत तब्बल ५ हजार डॉलरपेक्षा अधिक आहे आणि त्या उणे ७० अंश सेल्सिअस तापमानात साठवाव्या लागतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.