तृणमूल खासदाराच्या पोस्टमुळे पश्चिम बंगालमध्ये होणार पुन्हा एकदा राजकीय भूकंप?


कोलकाता – तृणमूल काँग्रेसमध्ये भाजपचे सहा ते सात खासदार प्रवेश करणार असल्याच्या ज्योतीप्रिया मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पुढील महिन्यात तृणमूल काँग्रेसचे ५० आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप तसेच दावे-प्रतिदावे पश्चिम बंगालमध्ये केले जात असतानाच तृणमूल खासदाराच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगल्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

अभिनेत्री ते खासदार प्रवास करणाऱ्या शताब्दी रॉय यांच्या फेसबुक फॅन पेजवर मी जर निर्णय घेतला तर १६ जानेवारीला दुपारी २ वाजता तुम्हाला माहिती देईन, अशी पोस्ट करण्यात आली आहे. २००९ पासून शताब्दी रॉय बिरभूमचे प्रतिनिधित्व करत आहेत. शताब्दी रॉय यांच्या फॅन पेजवर ही पोस्ट असल्याने यात कितपत तथ्य आहे याबाबत शंका व्यक्त होत आहे. पण शताब्दी रॉय यांचा फोन ही पोस्ट पडल्यापासून आऊट ऑफ रिच असल्याचे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

शताब्दी रॉय यांना मानसिक त्रास होत असून अनेक कार्यक्रमांना आपल्याला आमंत्रितच करण्यात न आल्याने अनुपस्थित असल्याचे या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. आपली भेट व्हावी, असे काही लोकांना वाटत नाही. मला अनेक कार्यक्रमांची माहितीच दिली जात नाही. जर मला माहितीच नसेल तर मी कसे जाणार? यामुळे मानसिक त्रास होत असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला नवीन वर्षात तुमच्यासोबत राहता यावे यासाठी काही निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही २००९ पासून पाठिंबा दिल्याबद्दल तसेच लोकसभेत पाठवल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. तुमचे हे प्रेम भविष्यातही मिळत राहील, अशी आशा आहे. मी खासदार होण्याआधीही बंगालच्या लोकांनी मला खूप प्रेम दिले. माझे कर्तव्य मी पार पाडत राहणार आहे. जर मी निर्णय घेतला तर १६ जानेवारीला दुपारी २ वाजेपर्यंत कळवेन.

शताब्दी रॉय यांच्या मानसिक त्रासाच्या टिप्पणीवर तृणमूल काँग्रेसचे सौगाता रॉय यांनी नाराजी व्यक्त केली असून शनिवारपर्यंत आपण वाट पाहू असे म्हटले आहे. योगायोग म्हणजे १६ जानेवारीला दुपारी ३ वाजता तृणमूल काँग्रेसचे नेते रजीब बॅनर्जी हेदेखील फेसबुक लाइव्ह करणार आहेत. १९ डिसेंबरला तृणमूलचे सात आमदार तसेच एका खासदाराने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.