आयटीआयमध्ये काळाशी सुसंगत, नव्या उद्योगांची आवश्यकता पाहून प्रशिक्षण आवश्यक – उद्धव ठाकरे


मुंबई : राज्यातील तरुणांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याच्या अनुषंगाने आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आयटीआयमध्ये मुलांना काळाशी सुसंगत तसेच नव्या उद्योगांची आवश्यकता पाहून प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कौशल्य विकास विभाग आणि विविध कॉर्पोरेट्स यांच्या पुढाकाराने हाती घेतलेल्या या उपक्रमास राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) अद्ययावतीकरण करणे तसेच कोकणाचा पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी ‘कोकण फ्युचर पार्क’सारखे उपक्रम राबविण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, कौशल्य विकास विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, कौशल्य विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह विविध विभागांचे सचिव, विज्ञान व तंत्रज्ञान केद्र, टाटा टेक्नॉलॉजी आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टाटा टेक्नॉलॉजी आणि इतर कॉर्पोरेट संस्थांच्या सहयोगातून राज्यातील ४१९ शासकीय आयटीआय आणि ५३ टेक्निकल स्कुल्सचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या संस्थांमध्ये जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाबरोबरच मुलांना आधुनिक काळातील आवश्यकतांनुसार कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १० हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यापैकी सुमारे ८२ टक्के निधी हा कॉर्पोरेट संस्थांच्या माध्यमातून तर १२ टक्के निधी हा राज्य शासनामार्फत खर्च केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी घेण्यात आलेल्या या पुढाकाराचे कौतुक करतानाच यासंबंधिचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश दिले.

यावेळी कोकण फ्युचर पार्कबाबत सादरीकरण करण्यात आले. हा उपक्रम कोकणाच्या पर्यावरणपुरक विकासाला चालना देणारा ठरु शकेल. याबाबत कोकणातील स्थानिक लोक आणि या क्षेत्रातील तज्ञांना सोबत घेऊन अजून काम करण्यात यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आयटीआयमधील कालबाह्य अभ्यासक्रम बंद करुन जे अभ्यासक्रम मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरु शकतील त्यांना चालना देणे गरजेचे आहे. शासकीय आयटीआयच्या अत्याधुनिकरणासाठी हाती घेतलेला हा कार्यक्रम आता गतिमान करणे गरजेचे आहे. पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या मुलांना याचा लाभ मिळेल यादृष्टीने यास गती देण्यात यावी. यासाठी राज्य शासनाच्या निधीचा आवश्यक हिस्सा उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काकोडकर म्हणाले की, आयटीआयचे आधुनिकीकरण तसेच कोकणच्या पर्यावरणपूरक विकासासाठी प्रस्तावित असलेला कोकण फ्युचर पार्क हे दोन्ही कार्यक्रम चांगले आहेत. राज्यात उच्च शिक्षण, संशोधन, उद्योग, स्टार्टअप्स याबरोबरच विविध प्रकारची प्रशिक्षणे यांना चालना देणे आवश्यक आहे. उद्योग आणि त्यातून रोजगार वाढीसाठी इको सिस्टम तयार होणे गरजेचे आहे. कोकणामध्ये नैसर्गिक संपदा आहे. विविध नैसर्गिक स्त्रोत आहेत. सर्वांच्या सहभागातून कोकणाच्या विकासाला चालना देता येईल, असे श्री. काकोडकर सांगितले.

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले की, बदलत्या काळानुसार उद्योगांमधील तंत्रज्ञान बदलले आहे. सर्व उद्योगांनी जुने तंत्रज्ञान बदलून उत्पादनासाठी अत्याधुनिक यंत्रे घेतली आहेत. याअनुषंगाने आयटीआयमधील मुलांनाही या अत्याधुनिक यंत्रांच्या वापराचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. सर्व मुलांना अत्याधुनिक प्रशिक्षण, त्यानंतर इंटर्नशीप आणि त्यानंतर चांगला रोजगार मिळवून देण्यासाठी विभाग कार्य करेल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादाजी भुसे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनीही यावेळी विविध सूचना मांडून हे दोन्ही उपक्रम गतिमान करण्यात यावे, असे सांगितले.